म्हापशात आरक्षणाचा फटका बसला खुद्द भाजपलाच

UNI
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग आरक्षणाचा खुद्द भाजपलाच मोठा फटका बसला आहे. या आरक्षणामुळे नगरसेवकपद भूषवणारे आमदार ज्योशुआ डिसोझा यांना त्या प्रभागात निवडणूक लढवणे शक्य होणार नाही; तसेच, भाजपच्या माजी नगरसेवकांची गोची झाली आहे. असे असले तरी बहुतांश विरोधकांना पूरक स्थिती निर्माण झाली आहे.

म्हापसा - म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग आरक्षणाचा खुद्द भाजपलाच मोठा फटका बसला आहे. या आरक्षणामुळे नगरसेवकपद भूषवणारे आमदार ज्योशुआ डिसोझा यांना त्या प्रभागात निवडणूक लढवणे शक्य होणार नाही; तसेच, भाजपच्या माजी नगरसेवकांची गोची झाली आहे. असे असले तरी बहुतांश विरोधकांना पूरक स्थिती निर्माण झाली आहे.

सरकारने राज्यातील पालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर म्हापसा नगरपालिका मंडळावर मागच्या कार्यकाळात निवडून आलेल्या अनेक भाजापसमर्थक माजी नगरसेवकांना त्याचा फटका बसला आहे, तर काही इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

म्हापसा मतदारसंघाचे आमदार ज्योशुआ डिसोझ यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना प्रभाग आरक्षणासंदर्भात स्वत:च्या सूचनांचा अहवाल सादर केला. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ज्या काही तत्कालीन नगरसेवकांनी स्वत:च्या प्रभागात आमदार ज्योशुआ डिसोझा यांना मताधिक्य मिळवून दिले होते, अशा काही व्यक्तींचे प्रभाग आरक्षित करण्यात आले, तर विरोधी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित ठेवले गेले आहेत, असे स्पष्ट होते. भाजपचे मंत्री मायकल लोबो यांच्‍या संपर्कात असलेल्‍या भाजपसमर्थक माजी नगरसेवकांना आरक्षणाच्या नावाखाली रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्याच्या आरक्षणाचा फटका म्हापसा भाजप मंडल अध्यक्ष सुशांत हरमलकर यांनाही बसलेला आहे.

महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले प्रभाग २, ४, ६, १०, १३ व १८, अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग ११, तर इतर मागासवर्गीयांसाठी १, ३, ६, १३ व १६ असे ठेवण्यात आले आहेत. वीस प्रभागांमध्ये दहा प्रभाग आरक्षित आहेत. या आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवकांपैकी चंद्रशेखर बेनकर, सुशांत हरमलकर, संजय मिशाळ, ज्योशुआ डिसोझा, माजी नगरराध्यक्ष रोहन कवळेकर, ॲनी आफान्सो, मार्टिन कारास्को यांना फटका बसला आहे. तसेच, माजी नगराध्यक्ष मायकल कारास्को, माजी नगराध्यक्ष रूपा भक्ता, माजी नगराध्यक्ष प्रभाकर वेर्णेकर, माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, माजी नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांना या आरक्षणामुळे स्वत:च्या प्रभागात निवडणुका लढवता येणार नाही.

मागच्या अनेक दिवसांपासून इच्छुक उमेदवार पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत होते. वर्ष २०१५ मध्ये प्रभाग आरक्षणात प्रभाग २, ४, ११, १६ आरक्षित होते. या वेळीसुद्धा हे प्रभाग पुन्हा आरक्षित ठेवल्यामुळे सर्वसामान्य गटातील संभाव्य उमेदवारांवर अन्याय झाला आहे, अशी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांची भावना आहे. विद्यमान नगरसेवक अल्पा भाईडकर, फ्रँकी कार्वाल्हो, मर्लीन डिसोझा, माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, दीप्ती लांजेकर, स्वप्नील शिरोडकर, विभा साळगावकर, राजसिंह राणे, माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, कविता आर्लेकर यांना निवडणुका लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हापसा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यंदा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना चांगल्यापैकी संधी मिळाली आहे. माजी ननगराध्यक्ष ॲड. सुभाक्ष नार्वेकर, सुधीर कांदोळकर, तसेच आनंद भाईडकर, प्रकाश भिवशेट, दीपक म्हाडेश्री, तारक आरोलकर, गुरुदास वायंगणकर, शुभांगी वायंगणकर, विकास आरोलकर, विजेता नाईक, स्तेहा भोबे, संजय बर्डे, श्रीराम शिंदे आदींना त्या दृष्टीने पूरक स्थिती निर्माण झाली आहे.

वर्ष २०१५ मधील पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत म्हापसा विकास आघाडीला सोळा जागा मिळाला होत्या, तर विरोधी गटाला चार जागा प्राप्त झाल्‍या होत्या. या वेळी भाजपाच्या विरोधात काँग्रेस, म.गो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच अन्य काही सामाजिक संघटना एकत्र येऊन निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या संभाव्य उमेदवारांबद्दल मतदारांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. त्‍याचा फायदा विरोधी पक्ष कितपत उठवतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. विरोधकांत दुफळी निर्माण झाल्यास भाजपचे उमेदवार आरामात निवडून येण्याची शक्यता आहे.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापशाचे आमदार ज्येाशुआ डिसोझा यांनी हल्लीच सर्व भाजपपुरस्कृत माजी नगरसेवकांची गुप्त बैठक घेऊन आगामी पालिका निडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. आरक्षणाच्या   मुद्द्यामुळे मागच्या सुमारे पंधरा दिवसांपासून आमदाराने माजी नगरसेवकांना भेटण्याचे टाळले होते, असे काही नगरसेवकांनी या वार्ताहराशी बोलताना स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या