म्हापशात चित्रशाळांच्या ऐवजी विक्री केंद्रे अधिक

ganesh chitrashala
ganesh chitrashala

म्हापसा, : शहरात गेल्या काही दशकांपासून गणेशमूर्तीच्या चित्रशाळा कार्यरत होत्या, पण गणेशमूर्ती घडवणाऱ्या कार्यशाळा कालानुरूप सध्या लोप झाल्या असून बहुतांश ठिकाणी विक्री केंद्रांच्या स्वरूपातील दुकानेच कार्यरत आहेत, असे एकंदर चित्र आहे. म्हापशात गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
गोव्यातील एकूण सर्व शहरांमधील एकंदर विक्री पाहिल्यास गणेशमूर्तींची सर्वाधिक विक्री म्हापसा शहरातच होत असते, असे ठामपणे म्हणता येईल. म्हापसा शहरात बार्देश तालुक्याप्रमाणेच प्रामुख्याने मये, पार्से, मांद्रे इत्यादी गावांतील मूर्तींप्रमाणे तसेच गोव्याबाहेरील गणेशमूर्तीही विक्रीस उपलब्ध होत असतात. सध्या म्हापसा बसस्थानकाच्या बाजूला ब्रागांझा इमारतीत पार्से येथील कलाकार भानुदास गवंडी यांनी पूर्णत: चिकणमातीपासून बनवलेल्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. इतरही काही ठिकाणी अशा गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
म्हापशातील मूर्तिकारांची परंपरा बव्हंशी नाटेकर घराण्याशी निगडित आहे. चणेकर, पोकळे, दिवकर इत्यादी घराण्यांनीही त्याबाबत मोठे योगदान दिलेले आहे. जुन्या काळात कै. सोनू नाटेकर, कै. वसंत नाटेकर आणि कै. भालचंद्र नाटेकर अशा मूर्तिकारांचा लौकिक संपूर्ण गोमंतकात होता.
कै. भालचंद्र नाटेकर यांचा वारसा त्यांचे सुपूत्र कै. यशवंत नाटेकर व जयपाल नाटेकर यांनी चालवला व सध्या तो वारसा त्‍यांचेच नातू जयंत नाटेकर चालवत आहेत. आता कै. भालचंद्र नाटेकर यांच्यानंतरची तिसरी पिढी मूर्ती घडवण्याचे कार्य करीत आहे.
म्हापशात सध्या जयंत नाटेकर व विपुल नाटेकर ही घराण्याची तिसरी पिढी मूर्तिकला क्षेत्रात स्वत:च्या वाडवडिलांचा पारंपरिक वारसा अव्याहतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कलाकार मंडळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरेख-सुबक आणि देखण्या गणपतींच्या मूर्ती घडवीत असल्याचे दिसून येते. श्रीगणेशाच्या मूर्तीबरोबरच महादेव-पार्वती तसेच सरस्वती, श्रीकृष्ण आणि लक्ष्मीच्या मूर्तीही ते सिद्धहस्त कलेद्वारे घडवतात. यशोदा-कृष्णाच्या मूर्तीही ते तयार करतात.
जयंत नाटेकर यांच्याकडे नाट्यालंकार भांडारही उपलब्ध असून उत्तर गोव्यात आजमितीस या क्षेत्रात त्यांच्याच नावाचा बराच बोलबाला दिसून येतो. नाट्य प्रयोगांसाठी रंगभूषा आणि वेशभूषा करण्यातही त्यांचा हातखंडा असून दिवाळीच्या दिवसात नरकासुराचे मुखवटेही ते घडवतात.
पूर्वी कै. महाबळेश्वर दिवकर व दिलीप पोकळे थोड्याफार प्रमाणात गणपतीच्या मूर्ती घडवीत असत. सध्या दिलीप पोकळे मोठ्या प्रमाणात नसले तरी दत्तवाडी भागातील काही ठराविक कुटुंबांना गणपतीच्या मूर्ती बनवून देतात.
हल्लीच्या काळात खोर्ली-सीम येथे ‘साई गणेश आर्ट्स’ ही चित्रशाळा दरवर्षी बऱ्यापैकी गणेशमूर्ती उपलब्ध करीत असते. तसेच खोर्ली येथेही जयंत नाटेकर यांच्या चित्रशाळेच्या परिसरात काही चित्रशाळा कार्यरत आहेत. म्हापसा येथे केंद्रवर्ती ठिकाणी हनुमान नाट्यगृहात नाटेकरांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. तिथे गणेशमूर्ती दाटीवाटीने अगदी नाट्यगृहाच्या पायऱ्यांपर्यंतसुद्धा ठेवल्याचे दिसून येते.

परराज्यातील गणेशमूर्तींची आवक वाढली
हल्लीच्या काही वर्षांत गोव्याबाहेरून येणाऱ्या मूर्तींची आवक वाढल्याने मूळचा इथला मूर्तिकार बाजूला पडत चाललेला दिसून येतो. कितीतरी वर्षे म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती कै. सोनू नाटेकर घडवायचे आणि खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती कै. वसंत नाटेकर घडवायचे. आता ठिकठिकाणी महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून येणाऱ्या मूर्तींची आवक वाढली असून अनेक ठिकाणी परराज्यातून आयात केलेल्या गणपतीच्या चित्रशाळा दिसून येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com