महाराष्ट्रातून येणऱ्या वाहनांची एकदाच तपासणी

Dainik Gomantak
मंगळवार, 12 मे 2020

दोन्ही तपासणी नाक्यांवर तपासणीमुळे होणारा वाहनांचा विलंब टळणार आहे. गोव्यात जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी वेळ लागत असल्याने महाराष्ट्र हद्दीत सुमारे ३ किलोमीटर पर्यंत बांदा शहरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या.

पणजी

महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या वाहनांची पत्रादेवी तपासणी नाक्यावर तर गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची तपासणी बांदा तपासणी नाक्यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दोन्ही राज्ये आजवर गाड्यांची व चालकांची तपासणी करत असल्याने सिमेवर गाड्यांच्या रांगा लागत होत्या. त्यावर आज उपाय काढण्यात आला.
सिंधदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व गोव्याचे प्रधान सचिव पुनीत गोयल यांच्यात झालेल्या चर्चेअंती समन्वयातून हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही तपासणी नाक्यांवर तपासणीमुळे होणारा वाहनांचा विलंब टळणार आहे. गोव्यात जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी वेळ लागत असल्याने महाराष्ट्र हद्दीत सुमारे ३ किलोमीटर पर्यंत बांदा शहरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या.
महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे गोवा शासनाच्या तपासणीमुळे बांद्याच्या व पत्रादेवीच्या दिशेने लांबच लांब अवजड वाहनांच्या रांगा लागत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांचे परजिल्ह्यातील चालक नाश्त्यासाठी बांदा बाजारपेठेत येत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमधून भीती व्यक्त करण्यात येत होती. परराज्यातील वाहन चालक हे रेड झोन मधून प्रवास करून येत असल्याने याबाबत नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या. 
पत्रादेवी बांदा सिमेवर आज सकाळी महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या तपासणी नाक्यांवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, गोव्याचे प्रधान सचिव पुनीत गोयल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पेडण्यचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते.
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांत तब्बल अडीच तास चर्चा झाली. चर्चेअंती महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची केवळ पत्रादेवी नाक्यावर तपासणी होईल. तर गोव्यातून महाराष्ट्रात येणार्‍या वाहनांची बांदा नाक्यावर तपासणी करण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे गोवा व महाराष्ट्र तपासणी नाक्यावरील तपासणीचा प्रत्येकी एक काऊंटर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ बंद करण्यात आला. तपासणी प्रक्रिया जलद होण्यासाठी पत्रादेवी (गोवा) येथे अतिरिक्त काऊंटर सुरु करण्याचे निर्देश प्रधान सचिव गोयल यांनी दिले. चर्चेत गोव्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती वाहनांना प्रवेश देण्यात आला त्याच्या दररोजच्या माहितीचे आदानप्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरदिवशी सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग व गोवा पोलिसांकडे ही माहिती प्राप्त होणार आहे.
यावेळी सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, राजेश विरनोडकर, देवा कुबल यांनी वाहनधारकांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. गोवा-बांबोळी रुग्णालयात रुग्णांना नेताना चेकपोस्टवर होणारी वाताहत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अत्यवस्थ स्थितीत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना सीमेवर थांबविण्यात येते. त्यानंतर गोवा हद्दीतील रुग्णवाहिकेतून रुग्णाला बांबोळीत नेण्यात येते. या प्रक्रियेसाठी कालावधी होत असल्याने गंभीर रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. यावेळी किरकोळ तपासणीनंतर तीच रुग्णवाहिका पुढे सोडण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गोवा प्रशासनाला दिले. गोवा सरकारने ही मागणी मान्य केली आहे.
     यावेळी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील अबकारी, पोलीस, आरटीओ, महसूलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या