गोव्यात भाषेचा मुद्दा ऐरणीवर

पणजीत मराठीप्रेमींचे आंदोलन : कारवारमध्ये कोंकणीप्रेमी रस्त्यावर
गोव्यात भाषेचा मुद्दा ऐरणीवर
marathi language protest in goaDainik Gomantak

पणजी : मराठी भाषाप्रेमींनी शुक्रवारी आझाद मैदानावर एकत्र येऊन मराठीला राजभाषेचा हक्क मिळावा, या मागणीसाठी आंदोलन केले. तर कारवारात कोकणीप्रेमींनी कोकणी पाट्या 15 दिवसात रंगवा,अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. त्यामुळे भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला.

विविध मराठी संस्था आणि मराठीप्रेमींनी मराठीला राजभाषेचे हक्काचे स्थान मिळावे म्हणून आज येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून पुन्हा नव्याने मराठीचा एल्गार पुकारला. मराठीला हक्काचे स्थान मिळेपर्यंत हे आंदोलन जोमाने पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी उपस्थित मराठीप्रेमींनी केला.

मराठी राज्य भाषा प्रस्थापन समिती, गोमंतक मराठी अकादमी, कोकण मराठी परिषद गोवा, मराठी असे आमुची मायबोली गट, गोमंतक मराठी साहित्य परिषद, गोमंतक मराठी भाषा परिषद या संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

कोकण मराठी परिषद गोवाचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष सागर जावडेकर, मराठी राजभाषा समितीचे निमंत्रक गो. रा. ढवळीकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर,गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर, मराठी आमुची मायबोलीचे प्रकाश भगत, वास्कोच्या माजी नगराध्यक्ष अर्चना कोचरेकर, स्वातंत्र्यसैनिक यशवंत मळीक, माजी महापौर अशोक नाईक, शांताराम रेडकर, माजी नगरसेवक तुषार टोपले, मराठी राजभाषा समितीचे कार्याध्यक्ष शाणुदास सावंत, युवा अध्यक्ष मच्छिद्र च्यारी, ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर शिंक्रे, अनुराधा मोघे, हनुमंत परब आदी अनेक मान्यवरांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

मराठी राजभाषा झालीच पाहिजे ,मराठीला हक्क मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन या आंदोलनाला सकाळी दहा वाजता सुरवात झाली व दुपारी दीड वाजता घोषणा देऊन सांगता झाली. या लढ्यासाठी मराठी संस्थांची आघाडी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन झाली.

marathi language protest in goa
गोवा फाऊंडेशनला प्रतिवादी करा; खंडपीठाकडून निर्देश

हक्क असूनही मराठीला डावलले जात आहे. गोवा, दमण व दीव संघप्रदेशाची भाषा कोकणी होती. मग गोव्याला राज्य दर्जा मिळाल्यावर राजभाषा कायद्यात दुरुस्ती हवी होती. पण झाली नाही,असे ॲड. रमाकांत खलप यांनी सांगितले.

दुसरीकडे कारवार भागातील कोकणी भाषेत लिहिलेल्या नामफलकांना काळे फासणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी तसेच 15 दिवसांत या पाट्या पुन्हा कोंकणीत रंगवून द्याव्यात अशी मागणी कारवार कोकणीप्रेमींनी केली आहे. तसे न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कारवार भागात कानडी आणि कोंकणी अशा दोन भाषांत रंगविलेल्या नामफलकांना काही दिवसांपूर्वी कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. त्याचा निषेध म्हणून आज कारवारच्या कोकणीप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. कारवारच्या 90 टक्के लोकांची भाषा कोकणी असून आपल्या भाषेत लोकांना व्यवहार करण्याचे घटनादत्त अधिकारांची कुणी पायमल्ली करू शकत नाही, असे यावेळी या मोर्चातील लोकांनी सांगितले. यावेळी बोलताना नंदकिशोर नाईक यांनी, ज्यांनी हे काळे फासण्याचे कृत्य केले आहे ते कारवारचे स्थानिक नसून इतर भागातून आलेले लोक आहेत. त्यांनी केलेली कृती ही निव्वळ दादागिरी असून त्यांच्या विरुद्ध एफआयआर नोंद करण्यासही पोलीस तयार नाहीत. अशी दमदाटी कारवारचे लोक सहन करून घेणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com