
मडगाव : एसजीपीडीएने अवघ्या चार वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये दुबईच्या धर्तीवर नूतनीकरण केलेल्या मडगावमधील किरकोळ मासळी मार्केटची पुन्हा दुर्दशा झालेली असून त्याचा त्रास तेथील विक्रेते व ग्राहकांना होत आहे. दुसरीकडे एसजीपीडीए त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.
मार्केटमधील टाईल्स उखडल्या गेल्या असून तिथे नियमितपणे सफाई केली जात नाही. प्लॅटफॉर्म धुतले जात नाहीत, व कचरा उचलला जात नसल्याच्याही तक्रारी आहेत. स्वच्छता नसल्याने ग्राहक तेथे पाय निसरून पडत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांची जास्त गैरसोय होत असल्याचे सांगितले जाते. देखभाल केली जात नसल्याने काही मासळी विक्रेते प्लॅटफॉर्म सोडून मोकळ्या जागेत बसतात व त्यामुळे नवी समस्या ओढवताना दिसत आहे.
फेलिक्स गोन्साल्विस म्हणाले, की नूतनीकरणावेळी प्रत्येक विक्रेत्याला व्यक्तीगत वीज जोडणीची तरतूद केली होती. पण अजूनही वीज जोडणी दिलेली नसल्याने समस्या उद्भवत आहे. आता दीड लाखांवर बील आलेले आहे, ते कोणी भरावयाचे हा प्रश्न आहे.
नूतनीकरण केले तेव्हा गोव्यातील ते आदर्श मार्केट ठरेल, असे सांगण्यात आले होते. पण हे नूतनीकरण चार वर्षातच कसे ढेपाळले, अशी विचारणा आता केली जाऊ लागली आहे.
इथेच अडले स्वच्छतेचे घोडे !
एसजीपीडीए अध्यक्ष आमदार दाजी साळकर यांनी या मार्केटची पहाणी केली होती. तेव्हा मार्केटची देखभाल व्यवस्थित व्हावयाची असेल तर विक्रेत्यांनी वाढीव शुल्क चुकते करावे, असे आवाहन केले होते. पण त्याला विक्रेत्यांनी प्रथम बाहेरील मासळी विक्री बंद करा, तसेच घाऊक मासळी विक्री सकाळी 7 वा. बंद करा, अशी अट घातली होती. त्या अटींचे पालनही झाले नाही आणि स्वच्छताही झाली नाही अर्थात घोडे तेथेच अडले.
मडगावातील आधुनिक गणल्या गेलेल्या या मासळी मार्केटमध्ये स्वच्छता रहावी, अशी आपली अपेक्षा आहे. आपण मार्केटच्या देखभालीबाबत ‘एसजीपीडीए’शी अनेकदा संपर्क साधला. पण संबंधितांनी मनावर घेतले नाही.
-फेलिक्स गोन्साल्विस, अध्यक्ष-मासळी विक्रेता संघटना
मडगावातील किरकोळ मासळी मार्केटमधील स्वच्छतागृहांना कुलूप ठोकण्यात आले आहे. या प्रकारामुळे येथे मासळी विकणाऱ्या महिला विक्रेत्यांची मोठी गैरसोय होते.
- फातिमा, मासळी विक्रेत्यांच्या नेत्या
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.