मुख्याधिकारी, नगराध्यक्षातील वादामुळे मडगाव पालिकेचा दर्जा ‘अ’वरून ‘ड’पर्यंत घसरला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

नगरसेवक केतन कुरतरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव पालिका ही बेवारस आहे. पालिकेला कोणी वालीच नाही. पालिकेची आर्थिक स्थिती मंदावली आहे, गेल्या पाच वर्षात मडगाव पालिकेने मडगावात अशी कोणतीही विकास कामे केलेली नाहीत.

नावेली: मडगाव पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या मधील अंतर्गत वादाचा पालिकेच्या विकास कामांवर परिणाम होत असून यामुळे नगरसेवक पालिका कारभारावर मात्र, उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत.

नगरसेवक केतन कुरतरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव पालिका ही बेवारस आहे. पालिकेला कोणी वालीच नाही. पालिकेची आर्थिक स्थिती मंदावली आहे, गेल्या पाच वर्षात मडगाव पालिकेने मडगावात अशी कोणतीही विकास कामे केलेली नाहीत.‘गोंय गोंयकार गोंयकारपण’ याच्या नावाखाली गोंयकारपण राखण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत, असे त्यांनी सांगितले. पालिकेचा दर्जा ‘अ’वरुन घसरून ‘ड’ वर आल्याचे ते म्हणाले. 

मडगाव पालिका नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी जशी खेळ संपण्यापूर्वी हार मानली जाते, तशीच हार पत्करली असल्याचे दिसून येत आहे. नवीन पालिका मंडळाच्या समोर अनेक आव्हाने असणार आहेत. पालिकेत नेतृत्व बदलाची गरज आहे. पुढील पालिका निवडणुकीत मडगावच्या जनतेने ज्या नगरसेवकांनी चांगली कामगिरी केली त्यानाच निवडून द्यावे, असे आवाहन कुरतरकर यांनी केले आहे. 

सध्या पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष नाईक यांच्यामधील अंतर्गत वादामुळे पालिकेत आपली कामे घेऊन येणाऱ्या नगरसेवकांची तसेच मडगावातील सर्व सामान्य जनतेची कामे होत नसल्याने पालिका निष्क्रिय ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी मडगाव पालिकेत नगराध्यक्ष नाईक व पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्यामध्ये तालमेळ नसल्याने पालिकेच्या विकास कामांवर परिणाम झाला असल्याचे सांगितले. पालिकेकडून कोणतीही कामे होत नाहीत. 

त्यामुळे आम्हाला आमचे स्वतःचे पैसे खर्च करून प्रभागातील कामे करावी लागतात. विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सध्या कोविडमुळे प्रत्यक्ष भेटीवर भर न देता दर आठ ते दहा दिवसांत ऑनलाईन मिटिंगद्वारे संपर्क साधून नगरसेवकांची बैठक बोलावण्यात येत आहे. 

या बैठकीत नगरसेवकांच्या समस्या सोडविण्यात येतात. गरज पडल्यास वीज कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाणी पुरवठा कार्यालयात आमदार स्वतः संबंधित नगरसेवकांना घेऊन जातात व संबंधित अधिकाऱ्यामार्फत कामे करून देतात, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक दामोदर नाईक यांनी आपली कामे पालिकेत घेऊन गेल्यास होत नसल्याचे स्पष्ट केले

मडगाव पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल शिरोडकर यांनी पालिका मुख्याधिकारी पालिका कर्मचाऱ्यांची सतावणूक करीत असून त्याच्या कक्षात कर्मचारी जाण्यासाठी घाबरतात.नगराध्यक्षा व पालिका मुख्याधिकारी यांच्यामध्ये असलेला वाद त्यांनी एकत्र येऊन चर्चा करून सोडवावा व पालिकेत आपली कामे घेऊन येणाऱ्या सामान्य लोकांची कामे वेळेवर पूर्ण करावी, असा सल्ला शिरोडकर यांनी दिला. पालिकेतील वादामुळे एकंदर विकास कामे ठप्प झाली असून सर्व यंंत्रणा निष्क्रिय बनली आहे, असे स्थानिका नागरिकांना वाटत आहे. त्वरित मडगावच्या विकासासाठी संबंधितांनी पावले उचलावीत. कोरोमुळे अनेक दिवस व्यवहार ठप्प झाले होते. आता विकासालाही चालना देण्यासाठी संबंधितांना लक्ष द्यावे, असे मतही नागरिकातर्फ ेव्यक्त करण्यात येत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या