बचत गटांनी फुलविले झेंडूचे मळे

तुकाराम गोवेकर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

केपेतील १६ स्‍वयंसेवी महिलांकडून १६ हजार चौ.मी. जागेत लागवड : स्‍वयंपूर्णतेचा निर्धार

नावेली: झेंडूची फुले (मेरी गोल्ड) तर कोकणी भाषेत ‘रोजा’ म्हणतात. ही झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून आयात केली जातात. गोव्यात झेंडू फुलांची शेती केली जात नसल्याचे फुल विक्रेत्यांना शेजारील राज्यातील फुले आणावी लागत आहेत. मात्र, आता गोव्यात झेंडू फुलांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. केपे तालुक्यातील १६ स्वयंसेवी महिला बचत गटांनी बार्शे, अडणे-बाळ्ळी, पाडी, आंबावली, मळकर्णे, पिर्ला या गावातील महिला बचत गटांचा समावेश आहे.

केपे कृषी कार्यालयाचे विभागीय अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत सुमारे १६ हजार चौरस मीटर जागेत झेंडू फुलांची शेती केली आहे. एका महिला स्वयंसेवी बचत गटाला प्रत्येकी एक हजार झेंडू फुलांची रोपे मोफत वाटप करण्यात आली असून ती कशा पद्धतीने लावावी, याचे मार्गदर्शन महिला स्वयंसेवी बचत गटांना करण्यात आले आहे. सध्या झेंडू फुलांची रोपटे लाऊन एक महिना पूर्ण झाला असून फुले तयार होण्यासाठी ५० दिवस लागतात. गेल्या वर्षी केवळ एक प्रयोग म्हणून पाच महिला स्वयंसेवी बचत गटांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार झेंडू फुलांची रोपटी मोफत वाटण्यात आली होती. त्‍यापैकी प्रत्येक महिला स्वयंसेवी बचत गटांना सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती प्राप्त झाली.

झेंडूच्या फुलांच्या शेतीसाठी पावसाळ्यात भाजीचे पीक घेताना भाजीबरोबर ही रोपटी लावली, तरी उत्पन्न देतात असे राऊत देसाई यांनी सांगितले. ज्या भागात पाण्याचे स्त्रोत आहेत त्या भागात कशा पद्धतीने शेती करता येईल याचा विचार करून तसेच कोणते पीक घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, याचा अभ्यास करून शेती केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते आवश्यक मार्गदर्शन केले जाते, असे राऊत देसाई यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तसेच केपे मतदार संघाचे आमदार चंद्रकांत कवळेकर हे कृषीमंत्री असल्यामुळे त्यांनी केपे तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यात जास्तीत जास्त लोक शेती व्यवसायाकडे यावेत यासाठी मोफत बियाणांचे वाटप खतांचे वाटप करीत आहेत. कृषी खात्यामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत, असे राऊत देसाई यांनी सांगितले.

हायब्रिड भाजीचे उत्पन्न घेण्यात येत असून गाजर, कलिंगड, मिरची, पपई असे उत्पन्न घेतले जात आहे. कृषीमंत्री कवळेकर यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असल्याने हे शक्य होत आहे.

अडणे - बाळ्ळी येथील सोमनाथ स्वयंसेवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा योजना फळदेसाई यांनी आपल्या स्वयंसेवी बचत गटात २० महिला असून आम्ही सुमारे दोन हजार चौरस मीटर जागेत ही झेंडू फुलांची शेती केली आहे. सुमारे दोन हजार झेंडू फुलांची रोपटी लावण्यात आली आहेत. रोपटी लावून एक महिना पूर्ण झाला असून आणखी काही दिवसांपासून फुले येण्‍याची प्रक्रिया सुरू होईल. दसरा, दिवाळी सण जवळ आला असून आम्ही फुले बाजारात विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बार्शे - केपे येथील सिद्धिविनायक स्वयंसेवी महिला बचत गट, पिर्ला - केपे येथील महामाया स्वयंसेवी महिला बचत गट मळकर्णे येथील सातेरी स्वयंसेवी महिला बचत गट तसेच इतरही बचत गट यावर्षी झेंडू फुलांची शेती करीत असल्याने गोव्यातील लोकांना ताजी झेंडूची फुले उपलब्ध होणार आहेत. या महिलांना फुलांच्या विक्रीतून थोड्याफार प्रमाणात आर्थिक फायदा होईल. 
 

संबंधित बातम्या