संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेला कुडचडे बाजार पूर्ववत

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

दिवाळीच्या निमित्ताने नागरिक सर्व भय विसरून मोठया उत्साहाने बाजारात खरेदी करीत असल्याचे चित्र कुडचडेतील जुन्या आठवणींना काहीसा उजाळा देऊन गेला. 

कुडचडे: कोरोना महामारी असो वा नसो या महामारीला लोक आता कंटाळले आहेत. किती दिवस म्हणून तोंड बंद करून घरी बसणार. नेहमीचे काम पोटापाण्याचा विषय, उद्योग व्यवसाय या सर्व गोष्टींचा विचार करू गेल्यास एकट्या दुकट्या नागरिकांनी काय करावे. बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते.

कुडचडे सावर्डे आठवड्याचा बाजार रविवारी असतो. संपूर्ण गोव्यात हा बाजार प्रसिद्ध होता. आज विविध कारणाने बाजारात गर्दीला ओहोटी लागली आहे. चिक्कार गर्दी अन दिवसभर उलाढाल होणारा बाजार अर्ध्या दिवसात घरची वाट धरू लागला  आहे, परंतु दिवाळीच्या निमित्ताने नागरिक सर्व भय विसरून मोठया उत्साहाने बाजारात खरेदी करीत असल्याचे चित्र कुडचडेतील जुन्या आठवणींना काहीसा उजाळा देऊन गेला. 

दिवाळीनिमित्ताने लागोपाठ येणाऱ्या उत्सवाने बाजारात वर्दळ निर्माण केल्याने उत्साही वातावरण पाहायला मिळाले. खरेदी विक्री जोरात सुरु होती. रविवार जरी आठवड्याचा बाजार दिवस असला तरी चार दिवस अगोदर बाजार फुल्ल भरला होता. रविवारी मात्र अपेक्षेपेक्षा वर्दळ कमी होती. याचे कारण दुकानदारांना विचारले असता ते म्हणाले, चार दिवस बाजार खरेदी झाली. त्यामुळे लोकांनी आधीच खरेदी केल्याने आज थोडी गर्दी कमी असली तरी गत आठ महिन्यानंतर दिवाळीनिमित्त चांगली विक्री झाल्याचे समाधान आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बाजार स्थलांतर केल्याने खरेदी करणाऱ्यांना आपली वाहने व्यवस्थित पार्क करून मोकळ्या वातावरणात बाजार करता येत असल्याने नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. पूर्वी रस्त्यावर बाजार भरत असल्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असे. आता पूर्वी इतकेच व्यापारी बाजारात विक्रीसाठी येत असले तरी मोकळ्या जागेमुळे विस्कळीतपणे बाजार भरला जात आहे. मात्र, सर्व बाजार सूडा मार्केटजवळ स्थलांतर केल्याने वरील बाजारात गर्दी कमी होऊ लागल्याने व्यापाऱ्यांना थोडी झळ सोसावी लागत आहे. कोविडच्या वातावरणात कुडचडे बाजाराला पूर्वीचे दिवस येत असल्याचे स्वरूप दिवाळीनिमित्ताने पाहायला मिळत आहे

संबंधित बातम्या