Madgaon Update: घाऊक मासळी मार्केटमध्ये व्यवहार सुरु

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

सोपो कंत्राटदाराची दहशत चालणार नसून या कंत्राटदाराला सोपो न देण्याच्या निर्णयावर मासळी विक्रेता संघटना ठाम आहे.

मडगाव :  घाऊक मासळी विक्रेता संघटना व सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांच्यात संघर्ष सुरु असला तरी आज सकाळी घाऊक मासळी मार्केटमधील व्यवहार सुरु होते. सोपो कंत्राटदाराची दहशत चालणार नसून या कंत्राटदाराला सोपो न देण्याच्या निर्णयावर मासळी विक्रेता संघटना ठाम आहे. तर फर्नांडिस हेच सोपो कंत्राटदार असून मासळी विक्रेत्यांनी त्यांच्याचकडे सोपो जमा केला पाहिजे,  अशी भूमिका दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीए) घेतली आहे. (Market resumes after dispute between Wholesale Fishermen's Association and Sopo Contractor) 

या वादावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आज तिन्ही पक्षांची बैठक बोलावली होती. घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. मात्र, एसजीपीडीएचे अधिकारी  व कंत्राटदार उपस्थित न राहिल्याने ही बैठक झाली नाही.  उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आता 5 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बैठक बोलावली आहे, असे घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहीम मुसा यांनी सांगितले.

सोपो गोळा करण्याच्या विषयावरून गेले काही दिवस सोपो कंत्राटदार व मासळी विक्रेता संघटनेमध्ये वाद सुरु आहे. बुधवारी मासळी विक्रेत्यांनी सोपो कंत्राटदारास न देता एसजीपीडीएच्या कार्यालयात जमा केला होता. सोपो आपल्याकडे न दिल्याने कंत्राटदाराने मार्केटचे फाटक बंद करून 47 मासळीवाहू वाहने आत अकडवून ठेवली होती.  त्यामुळे काल या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. आज पहाटे ही वाहने सोपो कर घेऊन सोडण्यात आली. तसेच, आजही  काही वाहने मासळी घेऊन आली होती. कंत्राटदाराने ही वाहने सोपो कर घेऊन मार्केटमध्ये सोडली. 

गोवा : तरुणाईच्या हिताचं काय? 'आप'चा भाजप सरकारला सवाल

एसजीपीडीएने (SGPD)  ठराव घेऊन सोपो कंत्राट आपल्यास दिले आहे. त्यानुसार आपण सोपो गोळा करत आहे. संघटनेकडून होत असलेल्या दहशत व खंडणीच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे व आपण पालिका निवडणूक लढवत असल्याने हे आरोप हेत असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला आहे. 

मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहीम मुसा यांनी फर्नांडिस हा बाऊन्सर वापरून मार्केटमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला. असा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु आहे. आम्ही अनेक वर्षांपासून या मार्केटात व्यवसाय करत आहोत. पण, असे गैरप्रकार पूर्वी कधी घडले नाहीत. दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार खपवून घेण्यात येणार  नाही. सोपो फर्ऩांडिस याच्याकडे जमा करण्यात येणार नाही, असे मुसा यांनी सांगितले. 

एसजीपीडीएचे चेअरमन आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सोपो कंत्राट फर्नांडिस यांनाच देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. मासळी विक्रेत्यांनी सोपो फर्नांडिस यांनाच द्यावा असे डिसा यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या