आरोग्य खात्याच्या परवान्याविना मार्केटमध्ये मासळी विक्री

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

म्हापसा शहरात असलेला पालिकेचा ‘मासळी व मांस विक्री मार्केट प्रकल्प’ गेली काही वर्षे आरोग्य खात्याच्या परवान्याविना नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मासळी मार्केटसंदर्भात गलिच्छतेबाबत म्हापसा येथील आरोग्य केंद्राने पालिकेला नोटीस जारी केली आहे.

 
 म्हापसा : म्हापसा शहरात असलेला पालिकेचा ‘मासळी व मांस विक्री मार्केट प्रकल्प’ गेली काही वर्षे आरोग्य खात्याच्या परवान्याविना नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मासळी मार्केटसंदर्भात गलिच्छतेबाबत म्हापसा येथील आरोग्य केंद्राने पालिकेला नोटीस जारी केली आहे. यासंदर्भात महिनाभरात कृती करण्याची आरोग्य खात्याने पालिकेला सूचना केली आहे.

मासळी मार्केटसाठी आरोग्य खात्याकडून ‘ना हरकत दाखला’/ परवाना घेण्याच्या हेतूनेही पालिकेच्यावतीने काहीच केले जात नाही. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात त्या ठिकाणी ‘प्रक्रिया प्रकल्प’ उभारणार असल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी पालिका प्रशासन खात्याला तसेच आरोग्य खात्याला दिले होते. तथापि, त्याबाबतही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सांडपाण्याच्या विल्हेवाटीसंदर्भात पालिनेने अजूनही प्रकल्प तिथे उभारला नसतानाही नियमबाह्य पद्धतीने ते मार्केट सुरूच आहे, असा दावा म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. साधना शेट्ये यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून मासळी मार्केटमधील स्वच्छतेसंदर्भातील आरोग्य खात्याकडून ‘ना हरकत दाखला’ अथवा ‘परवाना’ घेतला असल्यास तो सादर करण्यास कळवले होते. तथापि, ती कागदपत्रे दिलेल्या मुदतीत सादर करण्यात पालिका असमर्थ ठरली होती. कोविडमुळे तसेच अस्वच्छतेमुळे ते मार्केट लोकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याने बंद करण्यात यावे अशा आशयाचे लेखी निवेदन २० मार्च २०२० रोजी उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व आरोग्याधिकारी यांना सादर केले होते. तथापि, त्याबाबतही शासकीय पातळीवरून कार्यवाही झाली नव्हती.

या विषयासंदर्भात सातत्याने आवाज उठवणारे आरटीआय कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये म्हणाले, की हे मासळी मार्केट आता विक्रेत्यांसाठी न राहता ते मासळीचे घाऊक विक्री केंद्र झालेले आहे आणि विशेष म्हणजे त्यात नगरसेवकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. पालिकेची बाजारपेठ समितीही त्याबाबत काहीच करीत नाही. अस्वच्छ वातावरणात मार्केट सुरू ठेवणे म्हणजे लोकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.

अलीकडेच २१ ऑक्टोबर रोजी म्हापसा आरोग्य केंद्राच्या आरोग्य निरीक्षकांनी या मासळी मार्केटची पाहणी केली होती. ही नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत पालिकेने मासळी मार्केटच्या सांडपाण्यासाठी सोक पिट उभारण्यासंदर्भात कार्यवाही करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, अशी सूचना आरोग्‍याधिकारी डॉ. शेरल डिसोझा यांनी म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

शासकीय नियमांचा भंग करून हा मासळी मार्केट प्रकल्प सुरू आहे, हे सुमारे सहा महिन्यांपूर्वीच अर्थांत फेब्रुवारी २०२० मध्ये म्हापसा नागरी आरोग्य केंद्राने पालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारामुळे स्पष्ट झाले होते. परंतु, त्यानंतरदेखील आरोग्याधिकाऱ्यांकडून आवश्यक असलेला दाखला पालिकेने अद्याप मिळवलेला नाही. ‘कोविड-१९’ संदर्भातील जनव्यवहार थोडेफार पूर्वपदावर आल्यानंतर म्हापसा पालिका मंडळाने मासळी मार्केट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सांडपाण्याच्या विल्हेवाटीबाबत पालिकेने काहीच केलेले नाही.

संबंधित बातम्या