
Masandevichi Jatra Narve Goa
पणजी : गोवा जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो इथल्या विविध धार्मिक उत्सवांसाठी देखील प्रसिद्ध आहे. मग जांबावलीचा गुलालोत्सव, वास्कोचा दामोदर सप्ताह, शिरगावच्या लइराई देवीची जत्रा अशा प्रकारच्या उत्सवांनी भरलेल्या या गोव्यात एक विशिष्ट महत्व प्राप्त असलेली जत्रा भरते ती म्हणजे "मसणदेवीची जत्रा"
डिचोली, साखळी , कुडणे, खांडेपार आणि कुंभारजुवे या पाच गावातील नद्यांचा संगम होऊन पंचगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवी नदीच्या तीरावर आहे हे मसणदेवीचे देऊळ. नवसाला पावणारी ही देवी भूताखेतांपासून माणसांचे रक्षण करते, असे म्हटले जाते.
नार्वे, तळेवाडा येथे वारुळाच्या स्वरूपात विराजमान असलेली ही देवी कौंडीण्य गोत्रातील लोकांची देवता मानली जाते. या देवस्थानाचे सचिव गजानन गंगाराम शेट नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हजारे, पागोडकर, नार्वेकर अशा कौंडीण्य गोत्रातील लोक या देवीची उपासना करतात. मुळात हे देऊळ नसून एक पवित्र स्थान आहे. कालांतराने याला देवळाचे स्वरूप आले आहे.
गावातील एक वृद्ध महिला आपल्या गाईसोबत रानावनात हिंडत असताना एका वाघाने तिच्या गाईला आपले भक्ष्य बनविले. आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन डोळ्यांसमोर संपलेला पाहून तिला धक्का बसला व तिने जागीच आपले प्राण सोडले.
ज्या वाघामुळे हे घडले त्याला पश्चाताप होऊन त्याने आत्महत्या केली. कालांतराने जिथे त्या वृद्धेला मरण आले होते, त्या ठिकाणी एक वारूळ तयार झाले आणि लोकांनी त्याला देवीचा दर्जा दिला, अशी आख्यायिका गावकरी सांगतात.
१९१८ मध्ये रजिस्टर झालेल्या या मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी मोठी जत्रा भरते आणि असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने या जत्रेत सहभागी होतात. आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी, असा नवस करायला येणाऱ्यांची संख्या भाविकांमध्ये जास्त असते. तसेच नवसपूर्तीनंतर पाळणा देण्याची प्रथा या मंदिरात आहे.
मंदिराची खासियत म्हणजे इथे असलेले काजऱ्याचे झाड. इच्छापूर्ती न झालेल्या अतृप्त आत्म्यांना इथे मुक्ती दिली जाते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गरोदरपणात मृत पावलेल्या महिलांना या परिसरात पुरून त्यांची थडगी बांधली जातात व नंतर या झाडांवर खिळे मारून अशा आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. अशा प्रकारची शेकडो थडगी इथे दिसतात.
प्रत्येक देवी-देवतांप्रमाणे या देवीचे वाहन म्हणून मंदिरात वाघाची ज्याला वाघऱ्याची प्रतिमा असे म्हणतात ती देवीच्या गाभाऱ्याच्या समोर स्थापन केलेली आहे. असे म्हटले जाते की, सूर्यास्तानंतर या परिसरात देवी वाघावरून फेरी मारते. त्यामुळे जत्रेदिवशी सूर्यास्तानंतर या ठिकाणी कोणीच राहत नाही.
या जत्रेला कुठलीच तिथी अथवा नक्षत्र पाहिले जात नाही. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ही जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. एरवी वर्षभर दर मंगळवारी भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.