कंत्राटदाराने अचानक साहित्य हलविल्यामुळे सांगेवासीयांत नाराजी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

सांगेतील कित्येक वर्षांची लोकांची जुनी मागणी म्हणजे बेंडवाडा येथील पूल होय. वर्षभरापूर्वी या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. कंत्राटदाराने जमीन सपाटीकरण करून कामाला सुरवात करताना पुलासाठी आवश्यक खांब उभारणीसाठी खोदकाम करून खांबाची पायाभरणी केली.

सांगे : सांगेतील कित्येक वर्षांची लोकांची जुनी मागणी म्हणजे बेंडवाडा येथील पूल होय. वर्षभरापूर्वी या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. कंत्राटदाराने जमीन सपाटीकरण करून कामाला सुरवात करताना पुलासाठी आवश्यक खांब उभारणीसाठी खोदकाम करून खांबाची पायाभरणी केली. कामाला गती प्राप्त होत असताना अचानक ‘कोरोना’चे संकट आल्याने मार्च २०२० मध्ये कामाला ब्रेक लागला. 

महिनाभरात परप्रांतीय मजूर गावी परतले. त्यानंतर पाऊस आला. दिवाळीनंतर कामाला परत सुरवात होईल अशी अपेक्षा केली जात असताना आज अचानक सांगेतील बेंडवाडा पुलाचा गाशा गुंडाळून पुलासाठी आणलेले साहित्य कंत्राटदाराने उचलून नेण्यास सुरवात केल्याने सांगेतील जनतेत पुलाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

दसरा सणानंतर राज्यातील विकासकामे जलदगतीने सुरू झाली. त्यावेळी चौकशी केली असता वर्षभर काम केल्यानंतर सरकारने कंत्राटदाराला केलेल्या कामाची दमडीसुद्धा दिलेली नाही. एकूण एकोणीस कोटी रुपये खर्चून पुलाची उभारणी केली जाणार होती. आज अचानक सामान भरून नेण्याची प्रक्रिया सरू झाली. यावेळी कंत्राटदाराच्या कामगारांनी सामान हलविण्याविषयीचे कारण देण्यास नकार दिला. 

मात्र, काम सुरू न करताच सामान हलविण्यासाठी कंत्राटदाराला कामाची दमडी न दिल्याने स्वतः निर्णय घेऊन सामान हलवले की वरून आदेश आल्याने सामान हलविले यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचा अनुभव आला.

पुलाचे सामान उचलून नेण्यास सुरवात झाली असल्याचे सतत फोन कॉल येऊ लागताच गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कोतवाल यांच्याशी नेमकी माहिती काय म्हणून विचारणा केली असता, पैशाची अडचण असल्याचे उत्तर देण्यात आले. यासंदर्भात कंत्राटदार भेटायला येणार असल्याचे आपणास सांगितले आहे. यावर मीच प्रश्न केला की, जर कंत्राटदार उद्या भेटायला येणार, तर आज सामान हलविण्याचे कारण काय? यावरही त्यांनी पैशाची अडचण एवढेच उत्तर दिले. एकोणीस कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करूनच पुलाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता, मग आता ही पैशाची अडचण जर असेल, तर कामाची सुरवात कशी केली? राज्यात इतर विकासकामे कशी काय सुरू आहेत, की फक्त सांगेची विकासकामे करण्यासाठी पैशाची अडचण निर्माण होत आहे, हे सरकारने स्पष्ट करायला हवे.
- प्रसाद गावकर, आमदार

संबंधित बातम्या