डिचोलीत चार ठिकाणी भरणार माटोळीचा बाजार

तुकाराम सावंत
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

डिचोलीत चतुर्थीच्या माटोळीचा बाजार यंदा चार वेगवेगळ्या ठिकाणी भरणार आहे. दरवर्षी चतुर्थीकाळात डिचोलीत बॅंक ऑफ इंडिया समोरील जागेत तसेच बाजार संकुल तसेच बाजारातीलच मोकळ्या जागेत माटोळीचा बाजार भरत असे.

डिचोली 

डिचोलीत चतुर्थीच्या माटोळीचा बाजार यंदा चार वेगवेगळ्या ठिकाणी भरणार आहे. दरवर्षी चतुर्थीकाळात डिचोलीत बॅंक ऑफ इंडिया समोरील जागेत तसेच बाजार संकुल तसेच बाजारातीलच मोकळ्या जागेत माटोळीचा बाजार भरत असे. त्यामुळे चतुर्थीकाळात बाजारात प्रचंड गर्दी उसळत असे. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चतुर्थीकाळात बाजारातील गर्दीवर नियंत्रण येवून सामाजिक अंतराचे पालन व्हावे, यासाठी माटोळीचा बाजार बाजाराबाहेर भरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
माटोळीच्या बाजारासाठी बाजारपेठेबाहेर जागा निश्‍चितही करण्यात आल्या आहेत. शांतादुर्गा विद्यालय प्रांगण, हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहाबाहेर, बोर्डे येथील शेट्ये प्लाझा पार्क आणि बोर्डे वडाजवळील सरकारी प्राथमिक शाळा प्रांगण या चार जागा माटोळीच्या बाजारासाठी पालिकेने निश्‍चित केल्या आहेत. यामुळे गणेशभक्‍त ग्राहकांना परस्पर माटोळीचे साहित्य खरेदी करणे सोपे होतानाच, बाजारातील गर्दीवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे, असा विश्वास पालिकेला आहे. माटोळीच्या बाजारात गर्दी टाळण्यासाठी पालिकेचे कर्मचारी विक्रेत्यांना सहकार्य करणार आहेत.
कोरोना महामारीचे संकट ओळखून चतुर्थीकाळात बाजाराहाटीसाठी येणाऱ्या गणेशभक्‍त ग्राहकांनी सरकारच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क परिधान करुन सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन पालिका मंडळाने गणेशभक्‍त नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या