माटोळीचा व्यवसाय ऑनलाईनवर 

विलास ओहाळ
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. या उत्सवासाठी लागणाऱ्या माटोळीच्या वस्तू विक्री करणारे बाजार टाळेबंदीमुळे भरतील की नाही हे माहीत नाही. त्यामुळे काही विक्रेत्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग करून माटोळीच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे.

पणजी
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. या उत्सवासाठी लागणाऱ्या माटोळीच्या वस्तू विक्री करणारे बाजार टाळेबंदीमुळे भरतील की नाही हे माहीत नाही. त्यामुळे काही विक्रेत्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग करून माटोळीच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. फोन करा, बुक करा आणि घरपोच सेवेद्वारे माटोळीचे साहित्य मिळवा, असा उपक्रम अनेकांनी आता सुरू केला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या माटोळीसाठी वस्तूनुसार वेगवगेळे दरही निश्‍चित केलेले दिसून येतात. 
गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा उत्सव. त्यामुळे या उत्सवात सर्व कुटुंब एकत्रित येतात, परंतु टाळेबंदीमुळे किती कुटुंब एकत्र येतील, हे आता काही सांगता येणार नाही. सामाजिक अंतरामुळे गणेशोत्सवासाठी आमच्या घरी या, असेही निमंत्रण मिळाले तरी जाण्याचे धाडसही काहीजण करू शकणार नाहीत. एकंदर या उत्सवावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे अनेकांनी काही दिवसांपासून माटोळीसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीच्या व्यवसायासाठी समाजमाध्यमांचा वापर सुरू केला आहे. यामध्ये काहीजणांनी सिताफळ, अननस, काकडी, सफरचंद अशा फळांचे प्रत्येक एक नग त्या साहित्याच्या समुहात समावेश केला आहे. 
सध्याच्या टाळेबंदीमुळे विविध संगणकतज्ञ म्हणून व्यवसायात असणाऱ्या पर्वरी येथील श्रीपाद मोखडकर या युवकाने आपले इतर दोन मित्र योगशे (पेडणे) आणि राज नाईक (पर्वरी) यांच्या मदतीने माटोळीचे साहित्य ऑनलाईनद्वारे विक्रीस सुरुवात केली आहे. याबाबत श्रीपादने सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. बाजारात माटोळीच्या वस्तू नेऊन विक्री करण्यापेक्षा आम्ही त्या विकत घेऊन त्या ग्राहकांना घरपोच पोचविल्या जाणार आहेत. राज्यभरातून आमच्याकडे बुकिंग सुरू असून १८५० रुपयांत माटोळीचे साहित्य उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काही दिवसांत आम्हाच्याकडे ५० जणांनी बुकिंग केले असून, ही घरपोच सेवा गणेशोत्सवाला एक आठवडा बाकी असताना सुरू केली जाणार आहे. काही ग्राहकांनी ॲडव्हान्स रक्कमही ऑनलाईन खात्यावर भरली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एका बाजूला समाजमाध्यमांचा वापर अशा वस्तू विक्रीसाठी होत असला तरी काहीजणांनी ओळखीचा फायदा हेरला आहे. कामाबरोबरच आपल्या ओळखीच्या लोकांना संपर्क साधत काही कामगार वर्गाने अडीच हजार रुपयांचे माटोळी साहित्याचे किट देण्यास सुरुवात केल्याची माहिती खासगी आस्थापनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

असे मिळेल माटोळीचे साहित्य..! 
या वस्तूमध्ये नारळ, सिताफळ, पेरू, अननस, काकडी, सफरचंद, चिकू, मोसंबी, कारली, मावलिंग, डाळिंब, घागरा, कांगळा, कविंदळा, सुपारी, भोबरो, शर्वदा, हरणा, माटुळा, आंब्याची पाने, निरफणस, चिबुड, वांगे, नारळाचा घस, आंबाडे, समतळी, केळीचा घड, घोसाळी, टोरिंग, दोडकी अशा साहित्यांचा, तसेच काहीजणांनी यातील काही वस्तू कमी करून तेलाचा पाकिटाचा त्यात समावेश केल्याचे दिसून येते.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या