गोवा: नव्या मार्केट संकुलातील अतिक्रमणाविरुद्ध महापौरांची धडक कारवाई सुरूच 

 गोवा: नव्या मार्केट संकुलातील अतिक्रमणाविरुद्ध महापौरांची धडक कारवाई सुरूच 
panji without mask.jpg

पणजी:  राज्यात कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर मार्केट संकुलातील स्वच्छता, अतिक्रमण तसेच मास्क न वापणाऱ्यांविरुद्ध पणजी महापालिकेने आज सकाळी धडक कारवाई सुरू केली. नवनिर्वाचित महापौर रोहित मोन्सेरात यांची गेल्या पंधरवड्यातील दुसऱ्या ‘एन्ट्री’मुळे व्यापारीही चक्रावून गेले आहेत. दुकानाबाहेर सामान ठेवून केलेल्या अतिक्रमणप्रकरणी कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. (The mayor continues to crack down on encroachments in the new market complex) 

गेल्या कित्येक वर्षापासून पणजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी अस्ताव्यस्त सामान मांडून बाजारात येणाऱ्या ग्राहकांना चालण्यास वाट ठेवली नव्हती. सामानाचे ढीग रचून या मार्केटचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. माजी महापौर उदय मडकईकर यांच्या काळात सुरू झालेली ही कारवाई आता तरुण महापौर रोहित मोन्सेरात तसेच महापालिका मार्केट समितीचे अध्यक्ष प्रमेय माईणकर तसेच आयुक्त संजीत रॉड्रिग्ज पुढे नेत आहेत. त्यामुळे मार्केट संकुलात स्वच्छता व व्यापाऱ्यांनीही सामान रचून ठेवण्यात शिस्तबद्धता दाखविण्यास सुरवात केली आहे. 

महापौर रोहित मोन्सेरात यांनी महापालिका मार्केट समिती तसेच आयुक्त रॉड्रिग्ज व महापालिका कर्मचारी निरीक्षक व कामगारांना घेऊन आज सकाळी अचानक धडक दिली व मार्केटची पाहणी करण्यास सुरवात केली. नव्या पणजी मार्केट संकुलात प्लॅटफॉर्मवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना आपले अतिरिक्त सामान जमिनीवर ठेवले होते ते पटापट उचलण्यास सुरवात केली. यावेळी या व्यापाऱ्यांना ताकीद देण्यात आली. त्यांनी तळमजला तसेच पहिल्या मजल्यावर पाहणी केली. यावेळी अनेकांनी गाळ्याच्या बाहेर सामान लटकवले होते काही ठिकाणी दुकानातील कपाटे शटर्स असलेल्या बाहेरच्या जागेत लाद्या घालून सरकविण्यात आल्या होत्या. या लाद्या काढून टाकून सामान दुकानाच्या आतच ठेवाव्यात अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त रॉड्रिग्ज यांनी दुकानधारकांना दिला आहे. 

या मार्केट संकुलामध्ये स्वच्छता तसेच मास्क न वापरणाऱ्या दुकानदार तसेच ग्राहक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेचे निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांकडून कामाची बेपर्वाई होत असल्याने त्यांची कानउघाडणीकरण्यात आली. आयुक्त रॉड्रिग्ज यांनी काही दुकानधारकांनी मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली. जुन्या मार्केटमध्येही महापौर मोन्सेरात तसेच आयुक्त रॉड्रिग्ज यांनी महापालिकेच्या कामगारांसह फेरफटका मारला. सामान लटकवलेले सापडल्यास महापालिका कर्मचाऱ्यांना ते जप्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

... तर शिस्तभंगाची कारवाई! 
मार्केटातील व्यापाऱ्यांशी महापालिकेच्या काही स्वच्छता निरीक्षक तसेच काही कामगारांचे लागेबांधे असल्याने कारवाईत हलगर्जीपणा केला जातो यासंदर्भात विचारले असता महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले, त्या कामगारांना एक संधी देण्यात येत आहे. जर मार्केटात अस्ताव्यस्त दुकानाबाहेर सामान लटकलेले किंवा अतिक्रमण केलेले आढळून आल्यास संबंधित कामगार किंवा अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. 

प्रतिदिन ११ हजार रु. सोपो जमा
पणजी मार्केटात दिवसागणिक सरासरी सुमारे ११ हजार रुपयांपेक्षा महसूल ‘सोपो’मधून जमा होतो. त्यामुळे महिन्याला साडेतीन लाख  रुपये या ‘सोपो’मधून महापालिकेला मिळतात. वर्षाला हा महसूल ४५ लाखाच्या आसपास जमा होतो. पणजी मासे मार्केट, नव्या मार्केट संकुलात प्लॅटफॉर्मवरील व्यापारी, सकाळी ९ वाजेपर्यंत मार्केटबाहेर विविध भागातून व्यापार घेऊन येणारे व्यापारी यांचा त्यामध्ये समावेश आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com