पणजी शहरातील रस्ते फोडण्यास आणि खोदण्यास पूर्णपणे बंदी

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

शहरातील रस्ते 31 मार्च 2021 नंतर फोडण्यास किंवा खोदण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. 31 मार्चपूर्वी त्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी आज दिली. 

पणजी: शहरातील रस्ते 31 मार्च 2021 नंतर फोडण्यास किंवा खोदण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, रिलायन्स केबल व गॅस पुरवठा करणारी कंपनी या सर्वांना 31 मार्चपूर्वी त्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी आज दिली. 

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उदय मडकईकर यांनी सांगितले की पणजी शहरातील खराब रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत.  31 मार्चनंतर ते चांगल्या प्रकारे हॉटमिक्सिंग द्वारे डांबरीकरण करण्यात येणार आहेत . त्यासाठीच्या प्रक्रिया पूर्ण  झालेली आहे .  वीज खात्याने त्यांच्या गंजलेले खांब काढण्यासाठी तसेच जमिनीखालून केबल टाकण्यासाठी  आणि वीज वाहिन्या बदलण्यासाठी थोडा वेळ मागितला होता त्यांना  30 मार्चपर्यंत चा वेळ देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गेस पुरवणारी कंपनी, सार्वजनिक बांधकाम खात्याचा पाणीपुरवठा विभाग आणि रिलायन्स केबल यांनीही आपणास आपली उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला होता.

त्यांना 30 मार्च पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे . या सर्वांनी 30 मार्च पर्यंत आपली प्रलंबीत सर्व कामे पूर्ण करावीत. असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत.  31  मार्चनंतर पणजी शहरातील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्सिंगद्वारे डांबरीकरण सुरू होणार असल्याचे उदय मडकईकर यांनी सांगितले. काही झाले तरी 30 मार्च च्या पुढे वरील खात्यांना व कंपन्यांना  रस्ता खोदण्यास मुदत वाढवून देण्यात येणार नसल्याचे मडकईकर यांनी ठामपणे सांगितले.

हॉटमिक्सिंग केल्यानंतर रस्ते फोडण्यापेक्षा  प्रलंबीत कामे हॉटमिक्सिंगच्या पुर्वी व्हावीत  यासाठी  30 मार्च  पर्यंत सवलत देण्यात आल्याचे  सांगून  पणजी शहरातील सर्व रस्त्यांची हॉटमिक्सिंग करण्यासाठी पणजीचे  आमदार बाबूश मोन्सेरात  यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी चर्चा केली आहे व पणजीतील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगच्या कामाला मंजुरी मिळवली असल्याचे  महापौरांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या