गोमेकॉत एम. डी., एम. एस.च्या ऑनलाईन परीक्षा

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

२२ विशेष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्ण, ‘सिस्को वेबेक्स’चा वापर

पणजी

कोविड १९ च्या धास्ती, धावपळीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ऑफ मेडिसीन (एम. डी.), मास्टर ऑफ सर्जरी (एम. एस.) या पदव्युत्तर पदवी परीक्षा तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी ऑनलाईन मंचाचा वापर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून केला गेला आहे. वैद्यकीय परीक्षांसाठीही ऑनलाईन मंच वापरता येतो, हे गोमेकॉच्या प्रशासनाने सिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात गोमेकॉने मार्च, एप्रिल महिन्यातच यश मिळवले होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बाह्य परीक्षक असतात. त्यामुळे त्या परीक्षा वेळेवर होतील का याबद्दल शंका होती. मात्र १२० च विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने ऑनलाईन पद्धती उपयोगात आणण्याचे ठरवण्यात आले. सिस्को वेबेक्स या ऑनलाईन मंचाचा आधार घेऊन २२ विशेष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या अशी माहिती गोमेकॉतील सूत्रांनी दिली. समाज अंतराचे पालन करून विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा वर्गात दिल्या. तोंडी परीक्षेसाठी अंतर्गत परीक्षक विद्यार्थ्यांसमवेत होते तर बाहेरील परीक्षकांनी आभासी मंचावरून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तरे दिली. प्रात्यक्षिक परीक्षाही त्याच पद्धतीने घेण्यात आल्या.
ऑनलाईन मंचाचे यशस्वी प्रयोगही अनेक क्षेत्रात झाले आहेत. बैठका, परिषदा, व्याख्यानांसाठी ऑनलाईन मंचाचा वापर केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा या पद्धतीने घेता येतील का याविषयी साशंकता होती. सरकारनेही दहावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेत ऑनलाईन मंच परीक्षांसाठी वापरता येतील की नाही, या साशंकतेवर शिक्कामोर्तब केले होते. अखेरीस गोमेकॉच्या प्रशासनाने पुढाकार घेत ही कोंडी फोडली आणि पदव्युत्तर पदवी व पदविकेच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे घेत सर्व चर्चांनी पूर्ण विराम दिला आहे. गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रेंगाळलेल्या असताना विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण अधिष्ठातांनी या परीक्षा घेऊन दाखवल्या.
 

संबंधित बातम्या