म्हापशातील वैद्यकीय कचरा फोंडा पालिकेने परत पाठवला

 प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

कोरोनाची महामारी आटोक्‍यात आणणे मुश्‍किलीचे ठरत असताना कोरोना रुग्णांच्या मृत्युतही वाढ होत आहे.

फोंडा:  कोरोनाची महामारी आटोक्‍यात आणणे मुश्‍किलीचे ठरत असताना कोरोना रुग्णांच्या मृत्युतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशीसंबंधित वैद्यकीय घातक कचऱ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असताना चक्क म्हापशातील कोविडसंबंधीचा घातक कचरा फोंड्यात पाठवण्याचा प्रकार आज (गुुरुवारी) सकाळी घडला. फोंडा पालिकेने मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत म्हापशातील कोविड कचरावाहू टेंपोची सरळ म्हापशाला परतपाठवणी केली. विशेष म्हणजे हा कोविड कचरावाहू टेंपो फोंड्यातील भर शहरी लोकवस्तीत बराचवेळ उभा होता.

म्हापशातील कोविडसंबंधीचा कचरा फोंड्यात कसा काय पाठवला याबाबत पालिकेने तीव्र हरकत घेतली असून फोंडावासीयांना बाबतची माहिती कळताच त्यांनीही या प्रकाराला विरोध केल्याने पालिका प्रशासनाने हा कोविड कचरावाहू टेंपो अखेर म्हापशाला पाठवला.
 
फोंडा पालिकेने हल्लीच सरकारी योजनेंतर्गत सुमारे दीड टन क्षमतेचा जैविक व वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केरये - खांडेपार येथे नियोजित कचरा प्रकल्पाच्या जागेत एक "इन्सिनरेटर'' बसवला आहे. या इन्सिनरेटरमध्ये फोंड्यातील वैद्यकीय तसेच कोविडसंबंधीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. या इन्सिनरेटरची क्षमता कमी असल्याने इतर ठिकाणचा कचरा या ठिकाणी आणल्यास त्याची विल्हेवाट लावणे मुश्‍किलीचे ठरणार आहे. त्यामुळे हा कचरा परत पाठवला गेला. विशेष म्हणजे म्हापसा पालिकेने कोविडसंबंधीचा हा कचरा फोंड्याला पाठवताना कोणतीच पूर्वसूचना दिली नाही, त्यामुळे कोविडसंबंधीच्या कचऱ्याचे पालिका व सरकारला गांभीर्य नाही काय, असा सवालही फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे. 

उपलब्ध माहितीनुसार बांबोळी इस्पितळातील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प नादुरुस्त झाल्याने म्हापशातील हा कचरा फोंड्याला पाठवण्यात आला. मात्र त्यासंबंधी कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याची पालिकेतर्फे सांगण्यात आले. आज म्हापसा तर उद्या अन्य ठिकाणचा कोविड व इतर वैद्यकीय कचरा फोंड्याला पाठवण्याची शक्‍यता असल्याने तुमच्या भागातील कोविडच्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा, असा इशारा देत फोंडा पालिकेने अखेर म्हापसा पालिकेच्या कचरावाहू टेंपोची अखेर परतपाठवणी केली.  

संबंधित बातम्या