शांत असणारे आझाद मैदान मुक्तीच्या लढ्याचा इतिहास सांगत होते

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

राज्यात आज सर्वत्र मुक्तिदिनानिमित्त चैतन्याचे वातावरण होते. हा मुक्तिदिन हिरकमहोत्सवी असा सोन्याचा दिवस होता.

पणजी:  राज्यात आज सर्वत्र मुक्तिदिनानिमित्त चैतन्याचे वातावरण होते. हा मुक्तिदिन हिरकमहोत्सवी असा सोन्याचा दिवस होता. या सर्व आनंदामध्ये एरव्ही शांत असणारे आझाद मैदान मात्र मुक्तीच्या लढ्याचा इतिहास सांगत ‘जो शाहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’ असे गीत गात होते. कारण आझाद मैदानाच्या चहूबाजूंनी गोवा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी फ्लेक्सरूपात लावल्या होत्या. अशा वातावरणात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे येऊन हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे प्रभारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पणजीचे महापौर उदय मडकईकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रथम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली आणि काही वेळातच राष्ट्रपती येथे आले. राष्ट्रपतींच्यासोबत त्यांच्या पत्नीसुद्धा होत्या. त्यांनी हार घालून स्मारकाजवळ पाहून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलिस तुकडीच्या जवानांनीसुद्धा सॅल्यूट देत हुतात्म्यांना अभिवादन केले. 

आझाद मैदानाच्या चारी बाजूंनी गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो, गोवा मुक्तीच्या आठवणी आणि राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचे मोठाले फ्लेक्स लावण्यात आले होते. तसेच विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे हा माहोल उजळून निघाला होता. 

राष्ट्रपती येणार म्हणून येथील वाहतुकीची व्यवस्था दुसरीकडून करण्यात आली होती आणि परिसर पूर्णपणे रिकामा ठेवण्यात आला होता. आझाद मैदानावर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. आझाद मैदानावर येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. तसेच प्रत्येकाला सॅनिटायझर देण्यात आला. मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले होते.

आणखी वाचा:

मुक्तिदिनाच्या चैतन्याने नटली राजधानी -

संबंधित बातम्या