आशालता ताईंचा स्मृती गंध

सौ. अमिता नायक सलत्री
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

काही वर्षांपूर्वी पणजी सम्राट क्लबने आशालता वाबगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. उज्ज्वला तारकर त्यावेळी सम्राट क्लबच्या अध्यक्षा होत्या. सुप्रसिध्द अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची ही प्रकट मुलाखत घेण्याचे काम उज्ज्वलाने माझ्यावर सोपविले होते

काही वर्षांपूर्वी पणजी सम्राट क्लबने आशालता वाबगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. उज्ज्वला तारकर त्यावेळी सम्राट क्लबच्या अध्यक्षा होत्या. सुप्रसिध्द अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची ही प्रकट मुलाखत घेण्याचे काम उज्ज्वलाने माझ्यावर सोपविले होते. मला खूपच आनंद झाला या गोष्टीचा. मी पूर्ण पणे गृहपाठ करून मुलाखतीची प्रश्नावली तयार झाली. प्रत्यक्ष मुलाखतीच्या आदल्या दिवशी हॉटेल डेलमंडमध्ये मी त्यांनी भेटले. मी पण त्यांच्याच गावची म्हणजेच काणकोणची आहे, हे त्यांना कळल्यावर अगदी खूष होऊन त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मी अगदी लहान असताना, तुमचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक पणजीला पाहिले होते. दै. ‘गोमन्तक’मध्ये काम करणारा माझा मामेभाऊ वामन प्रभू मला खास त्या नाटकाला घेऊ गेला होता. त्या नाटकातली तुमची ती अवर्णनीय भूमिका आम्हा सर्वांनाच प्रचंड आवडली होती. तुम्ही किती किती सुंदर दिसता, किती किती गोड गाता, तुमच्यातल्या त्या ‘मत्स्यगंधेचा’ सुगंध त्या छोट्या वयात जो मी माझ्या मर्मबंधात दाटून ठेवला आहे, तो अजूनही ताजा-ताजाच आहे. सर्वच प्रेक्षकांच्या हृदयांतही तो तसाच दाटून राहिला असेल, इतकी तुमची ती भूमिका त्यावेळी गाजली होती, असे मी आशाताईंना भेटल्या भेटल्या म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले म्हणाली, किती किती गोड बोलतेस ग तू खरेच गोव्यातले रसिक असेच कलाकाराना भरभरून प्रेम देतात, कलाकारांना जणू ते देवच मानतात, हे आम्हाला नेहमीच अनुभवायला मिळते. गोवेकारांसारखे असे जीव तोडून कलाकारांवर मनसोक्त प्रेमाचा वर्षाव करणारे मला वाटते जगात इतरत्र कोठेच नाहीत.

मराठी हिंदी आणि कोकणी, नाट्य चित्रपटसृष्टी आपल्या उत्कृष्ट आणि दमदार अभिनयाने गाजविलेल्या आशालता ह्या एक उत्कृष्ट गायिकाही होत्या. ‘मत्स्यगंधा’, ‘संशय कल्लोळ’ वगैरे नाटकातली शिवाय त्यांची कित्येक कोकणी गीते एकल्यावर त्यांच्या आवाजातला तो मधूर असा गोडवा जाणवतोच. माझ्या मुलखतीत मी त्यांना म्हटले की, ताई, तुमच्या नावात लता आहे आणि आशाही आहे. शिवाय तुम्ही आणि आशा. लता मंगेशकरही गोव्याच्या त्यामुळे जसा तुमच्या नावांत त्या दोघींचा समावेश आहे, तसे तुमच्या आवाजातही त्या दोघींचा प्रभाव आहे का? यावर त्यांनी पटकन आपले कान पकडून म्हटले की, नाही गं, लता-आशाचा आवाज अगदी दैवी चमत्कार आहे जणू. त्यांच्यापुढे मी दर्या में खसखस अशीच आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की, माझ्या नावात लता-आशा आहे. मंगेशकर घराणे म्हणजे गोमंतकला लाभलेली एक अपूर्व अशी देणगी आहे.

आशालताताईंच्या स्वभावातला हा विनम्रपणा आम्हा सर्वांना खूप काही शिकवून जाणारा आहे. आशालताताईंनी आतापर्यंत आईची-सासुची जाऊ- नणंदेची अशा विविध नात्यातल्या भूमिका केल्या. प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी सोज्वळपणे वठविल्या. त्यांच्या त्या लावण्यरुपी चेहऱ्यातच सारी सौजन्यता ठसठसून भरलेली असायची. ती-ती मालिका किंवा तो-तो चित्रपट पाहिला की, असे वाटायचे की मलाही अगदी अशीच सासू किंवा नणंद जाऊ हवी होती. प्रत्येक प्रेक्षकाला ती आपल्या अभिनयातून असाच जिव्हाळा, वात्सल्य लाभायची. सुलोचना, जयश्री गडकर या अत्यंत श्रेष्ठ आणि कसलेल्या गाजलेल्या कालाकारांच्या तोडीचीच कलाकार म्हणून आशाताईंकडे नेहमीच पाहिले जाते हेही विशेष.

मुलाखतीतल्या माझ्या कित्येक प्रश्नांमधला ह एक पुढील प्रश्न होता की, ‘कित्येक महिला कलाकार अमूक एक वय झाले की आपली कला सोडून देतात. आपले कुटुंब आणि आपला संसार यातच ती पुढे गुंतून पडतात त्यांना तुम्ही काय उपदेश द्याल? त्यावर त्या म्हणाल्या, ‘कुठलीही कला देऊन देव आम्हाला जेव्हा जन्म देतो, तेव्हा सर्वप्रथम आपण त्या निर्मात्याचे आभार मानले पाहिजेत, दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवाला एक वचन दिले पाहिजे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू मला दिलेल्या या कलेची मी जतन करीन. मरेपर्यंत ती कला जगत जगवतच जगेन. कारण कलेला कधीच वय लागत नाही कलाकार कधीच म्हातारा होत नाही.’

आशालता ताईबाबतीच नेमके हेच घडले आहे. वयाच्या ७९ वर्षे पर्यंत त्यांनी सातत्याने अभिनय केला आणि चक्क शूटींग चालत असतानाच त्यांचा जीवघेणे मृत्यू झाला. जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी ही अशी कलेची सेवा केली अशा या अत्यंत लाघवी स्वभावाच्या रसिक मोहिनीला माझी ही शब्दरुपी श्रध्दांजली.
 

संबंधित बातम्या