‘मानसिक आरोग्यासाठी सुसंवाद हवा’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सुसंवाद, विनोदबुद्धी, दुसऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय आणि आपुलकीचे बंध ही चतुसूत्री आवश्यक असल्याचे प्रतिपादन उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मनोविकारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.

खांडोळा : चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सुसंवाद, विनोदबुद्धी, दुसऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय आणि आपुलकीचे बंध ही चतुसूत्री आवश्यक असल्याचे प्रतिपादन उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मनोविकारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले. ते बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बेतकी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. ब्रँडा पिंटो आणि विस्तार अधिकारी राजू घाटवळ हे उपस्थित होते.

डॉ. पाटकर पुढे म्हणाले, आजच्या कोरोनाच्या काळात सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचारी मानसिक दबावाखाली आहे,  तथापि अशा संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे योगदान खूप मोलाचे आहे. असे योगदान देऊन आपण सार्थक जीवन जगतोय, हे मनाला अनुभवू दिले तर सध्याच्या काळातील वाढीव कामाचा ताण हलका होईल. 

डॉ. पाटकर पुढे म्हणाले, कोरोनाची भीती, अनिश्चितता, एकटेपणा, आर्थिक अडचणी वगैरे कारणांमुळे समाजातील प्रत्येक चौथी व्यक्ती तणावग्रस्त आहे. अशा व्यक्तींना ऐकून घेतल्याने, त्यांच्याशी आपुलकीचे चार शब्द बोलल्याने त्यांचा ताण आपण सुसह्य करू शकतो.
मानसिक आजार हे शारीरिक आजाराप्रमाणे असून त्यांचे कारण मेंदूतील चेताद्रवातील असमतोल असल्याचे डॉ. पाटकर यांनी सांगितले. यावेळी विविध उदाहरणे देऊन वेगवेगळ्या मानसिक आजाराविषयी त्यांनी माहिती दिली. 

प्रास्ताविक आरोग्य अधिकारी डॉ. ब्रँडा पिंटो यांनी केले तर आभार राजू घाटवळ यांनी मानले. यावेळी बेतकी आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या