'गोवा कार्निव्हल’मध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

राजधानी पणजी शहरातील कार्निव्हल मिरवणुकीत पारंपारिक गोमंतकीय लोकनृत्ये, लोककला यांच्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारे चित्ररथ सादर झाले.

पणजी : राजधानी पणजी शहरातील कार्निव्हल मिरवणुकीत पारंपारिक गोमंतकीय लोकनृत्ये, लोककला यांच्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारे चित्ररथ सादर झाले. आजच्या कार्निव्हलला मिरवणुकीत प्रेक्षकांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली. मात्र चित्ररथांसोबतची नृत्य पथके मर्यादित होती.  पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी मांडवी पुलाजवळ कार्निव्हल मिरवणुकीला झेंडा दर्शवून व हवेत फुगे सोडून मिरवणुकीचे उद्‍घाटन केले.

महापौर उदय मडकईकर, पर्यटन खात्याचे संचालक मिनीनो डिसोझा, अधिकारी दीपक नार्वेकर उपस्थित होते.‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत आजगावकर यांनी उद्‍घाटन केले. गोवा राज्य पर्यटन राज्य असल्याने पर्यटन वाढीसाठी कार्निव्हल सारख्या सोहळ्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. कार्निव्हल  व शिमगोत्सव राज्य उत्सव असल्याने ते आयोजित करणे सरकारचे कर्तव्य ठरते, असेही आजगावकर म्हणाले. यानंतर किंग मोमो झालेले एरिक डायस यांनी  जबाबदारीचे भान ठेवा. गोव्याचे हित ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश दिला.

या कार्निव्हल मिरवणुकीत लहान मोठे असे २९ चित्ररथ सहभागी झाले. ज्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यातर्फे जनजागृती करणाऱ्या चित्ररथांचाही समावेश होता.  झाडांच्या कत्तलीमुळे प्राणी संकटात असल्याचा संदेश देणारे बरेच चित्ररथ होते. वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या काही स्पर्धकांनी कोळसा प्रदूषण या विषयावर वेशभूषा केली होती. काही चित्ररथ पथकांनी प्रदूषण विषयांवर चित्ररथाद्वारे जागृतीवर भर दिल्याचे दिसून आले. दिवजा सर्कस ते कला अकादमी या  दयानंद बांदोडकर रस्त्यावर ही कार्निव्हल मिरवणूक काढण्यात आली. 

संबंधित बातम्या