MGP: भाजपशी युती म्हणजे आत्महत्या!

2022 च्या विधानसभा निवडणूका ठरणार राज्यातील मोठे परिवर्तन
MGP: भाजपशी युती म्हणजे आत्महत्या!
MGP Leader Dhavalikar in Press Conference Dainik Gomantak

फोंडा: दोनवेळा दगा दिलेल्या भारतीय जनता पक्षाशी (BJP) पुन्हा एकदा युती (Alliance) करणे म्हणजे मगोपने (MGP) आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे, असे प्रतिपादन मगोपचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी बांदोडा - फोंडा (Ponda) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

सुदिन ढवळीकर म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली आणि पश्‍चिम बंगालमधील पक्षांनी गोव्यात धाव घेतली आहे. या राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्कही साधला आहे; मात्र गोव्याचे भवितव्य हे युवा पिढी आणि सज्ञान गोमंतकीयांच्या हाती आहे. २०२२ हे गोव्यासाठी परिवर्तनाचे वर्ष असायला हवे. युतीचा विचार हा आपण नव्हे तर मगोपची केंद्रीय कार्यकारिणी ठरवते हेही त्यांनी नमूद केले.

MGP Leader Dhavalikar in Press Conference
रोजगार हमी माहितीसाठी ‘आप’ गोमंतकीयांच्या भेटीला

गोव्यातील राजकारणाची पातळी एकदम घसरली असून कुणीही उठतो आणि काहीही बरळतो. पडेल आमदारांना तर कोणतेच तारतम्य राहिलेले नाही, असे सांगताना या लोकांच्या बरळण्याकडे कितपत लक्ष द्यायला हवे, हे आता गोमंतकीयांनीच ठरवायला हवे, असे ढवळीकर म्हणाले. सत्तर वर्षांहून जास्त वयाच्या राजकारण्यांना घरी बसवायला हवे. तरुण नव्या दम्याच्या युवा नेत्यांना प्राधान्य द्यायला हवे, असे सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले. सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वाढदिन सोहळे साजरे केले जात आहेत. मात्र या सोहळ्यातून या पक्षाचेच लोक कोरोना पॉझिटिव्ह व्हायला लागले असून, इतरांना शहाणपणाचे धडे देणाऱ्या या लोकांनी स्वतः काहीतरी शिकून घ्यायला हवे, अशी टाका त्यांनी केली.

सरकारकडे निधीचा अभाव

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. आता सरकार या लोकांना एकरकमी पाच हजार रुपये देत आहे. वास्तविक ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कारकिर्दीत आपण समाजकल्याण खात्याचा मंत्री असताना सुरू होती. आता तीच योजना लोकांसमोर मांडण्यात आली आहे. सामाजिक योजनांचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नाहीय, असे ढवळीकर म्‍हणाले.

MGP Leader Dhavalikar in Press Conference
तृणमूल म्हणजे काँग्रेसने विकत बोलाविलेले श्राद्ध

आता भोगा आपल्या कर्माची फळे!

राज्यात इतर पक्षांचे आमदार पळवण्याची सुरुवात काँग्रेस पक्षाने केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्याची री ओढली. एखाद्या राजकीय पक्षाचे आमदार फोडण्याचे कुकर्म ज्या लोकांनी केले त्यांना त्याची भरपाई आताच मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांना तृणमूल काँग्रेसने पळवल्याने काँग्रेसला स्वतःचे आमदार गमावण्याची वेळ आली आहे. भाजपचीही ती स्थिती होणार असून, इतरांना जे त्रास दिले, मनःस्ताप दिला ते काँग्रेस आणि भाजपला भोगावेच लागेल, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.