म्हापशातील मासळी विक्री प्रकल्प नियमबाह्य

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

मासळी प्रकल्पात कुणाही विक्रेत्याला बसायला दिले जाते, असा आरोप करून अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी; आणि श्रीमंत, दुकानदार वर्गातील व्यवसायिकांना येथे मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी काही विक्रत्यांनी केली आहे.

म्हापसा, 

म्हापसा शहरातील मासळी विक्री प्रकल्प नियमबाह्य पद्धतीने चालत असल्याचे उघड झाले असून, पालिकेला आरोग्याधिकाऱ्यांचा ‘ना हरकत दाखला’ अद्याप उपलब्ध झाला नाही. ‘ना हरकत दाखला’ नसताना टाळेबंदीनंतर कोणत्या आधारे मासळी मार्केट पुन्हा सुरू करणार, असा प्रश्‍न सध्या मिर्माण झाला आहे.
म्हापसा पालिकेच्या मासळी विक्री प्रकल्पाला स्वच्छतेच्या संदर्भात आवश्‍यक असलेला ना हरकत दाखला आरोग्य खात्याकडून अद्याप मिळालेला नाही, हे आता उघड झाले आहे. खोर्ली, म्हापसा येथील एक आरटीआय कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये यांनी यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराला गोवा सरकारच्या आरोग्य खात्याअंतर्गत कार्यरत असलेल्या म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्राने दिलेल्या उत्तरामुळे हा मुद्दा समोर आला आहे.
‘कोविड-१९’ संदर्भातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर म्हापसा पालिका मंडळाने मासळी मार्केट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर, त्यासंदर्भातील पालिकेचे व्यवहार कायद्याचे पालन करून होणार नाहीत, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या मासळी प्रकल्पात कुणाही विक्रेत्याला बसायला दिले जाते, असा आरोप करून अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी; आणि श्रीमंत, दुकानदार वर्गातील व्यवसायिकांना येथे मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी काही विक्रत्यांनी केली आहे.
म्हापसा मासळी मार्केट प्रकल्पातील विक्रेत्यांच्या संघटनेच्या अध्यक्ष शशीकला गोवेकर या प्रकल्पात व्यवहार करण्यासंदर्भात अपात्र ठरतात, असा दावा केला जात आहे. गोवेकर यांच्या मालकीचे दुकान म्हापसा बाजारपेठेतील चिकन सेंटरमध्ये आहे, असा दावा जवाहरलाल शेट्ये म्हणाले, मासळी बाजारपेठेत गोवेकर यांची नेहमीच अरेरावी होत असते; अन्य मासळी विक्रेत्यांच्या टोपल्या हिसकावण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत असतात. तात्पर्य, मासळी मार्केट स्वत:च्या हातांखाली ठेवण्याचा त्या प्रयत्न करीत असतात. त्यामुळे, प्राप्त परिस्थितीत म्हापसा पालिकेने दैनंदिन स्थानिक विक्रेत्यांची व्याख्या सुस्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जे विक्रेते स्वत:हून दररोज पारंपरिक पद्धतीने मासे गरवून आणतात त्यांनाच विक्रेते म्हणून बाजारपेठेत स्थान मिळायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. परंतु, शशीकला गोवेकर घाऊक पद्धतीने मासळी विक्री करीत असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत पालिकेचे चौकशी करावी. म्हापसा बाजारपेठेतील मासळी विक्री प्रकल्पात केवळ किरकोळ विक्री करण्याऱ्यांना स्थान मिळायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या