म्हापशात भाजपच भाजपच्या विरोधात

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

म्हापसा नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला भाजपचेच प्रमुख नेते, कार्यकर्ते शह देण्याच्या तयारीत असल्यामुळे विद्यमान पालिकेतील भाजप पुरस्कृत नगरसेवकांना इतर विरोधी पक्षाबरोबर भाजपच्या अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

म्हापसा : म्हापसा नगरपालिकेचा कार्यकाळ येत्या ५ नोव्हेंबर रोजी संपत आहे. कोरोना महामारीमुळे पालिकेची नियोजित ऑक्‍टोबर महिन्यातील निवडणूक ३ महिने पुढे ढकलल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे अनेक उमेदवारांना मोर्चेबांधणी करण्यास वेळ मिळाला आहे. म्हापसा नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला भाजपचेच प्रमुख नेते, कार्यकर्ते शह देण्याच्या तयारीत असल्यामुळे विद्यमान पालिकेतील भाजप पुरस्कृत नगरसेवकांना इतर विरोधी पक्षाबरोबर भाजपच्या अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

हे चित्र राजकीय पटावर स्पष्ट झाले आहे.२०१५ मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री व म्हापशाचे आमदार स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनीच माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्याकडून वॉर्डाची फेररचना करून घेतली होती. १५ प्रभागाचे २० प्रभाग करून आमदार डिसोझा यांनी म्हापसा विकास आघाडी स्थापन करून पालिकेच्या निवडणुकीत २० भाजप पुरस्कृत उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी १६ उमेदवार विजयी झाले व ४ अपक्ष उमेदवार विजयी झाल्यामुळे फ्रान्सिस डिसोझा यांना आपल्या राजकीय प्रवासात प्रथमच पूर्ण बहुमताची सत्ता म्हापसा पालिकेत प्रस्थापित करण्यात यश आले होते.

म्हापसा पालिकेत ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा विकास आघाडी सत्तेत आली, पण माजी मंत्री डिसोझा यांनी म्हापसेकरांना अस्थिर प्रशासन दिले. पाच वर्षांच्या कार्यकाळात या गटाने तीन नगराध्यक्ष पाहिले. संदीप फळारी व रोहन कवळेकर यांना समान १८ महिन्यांसाठी नगराध्यक्षपद मिळाले. सुधीर कांदोळकर यांनी पोटनिवडणुकीत बंड केल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदाची संधी गेली व त्याचा फायदा विद्यमान नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांना झाला. २५ महिन्यांचा कार्यकाळ रायन यांनी भूषविला, तर उपनगराध्यक्षपद मर्लिन डिसोझा यांना पाच वर्षे मिळाली. कसलाही करार न झाल्यामुळे त्या पदावर राहिलेल्या ज्यष्ठ नगरसेविका असल्यामुळे फ्रांसिस डिसोझा यांनी त्यांना पाठिंबा दिला. अनेक तरुण नगरसेवकांना भाजपने उपनगराध्यक्षपदासाठी संधी दिली नाही. त्यामुळे नगरसेवकामध्ये नाराजी होती.
म्हापसा मतदारसंघातील जनतेने तत्कालीन उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर विश्‍वास ठेवून १६ नगरसेवक त्यांच्या गटाचे निवडून दिले, पण प्रत्यक्षात २० ही नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक पाहिल्यास ७० टक्के नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक कोरेच आहे. पालिका मंडळाच्या अनेक बैठका झाल्या, पण बहुसंख्य नगरसेवकांनी तोंडातून भ्रही काढला नाही. ज्येष्ठ नगरसेवकांपैकी संदीप फळारी, सुधीर कांदोळकर, रायन ब्रांगाझा, तर नवीन नगरसेवकांपैकी राजसिंग राणे, तुषार टोपले, संजय मिशाळ, मार्टिन कारास्को या नगरसेवकांनी प्रत्येक बैठक अनेक प्रश्‍न, विकासकामांचा पाठपुरावा, म्हापशाच्या अनेक समस्या या मंडळींनी मांडल्या. महिला नगरसेविका बैठकांना उपस्थिती लावत होत्या, पण एक शब्द बोलण्यास तयार नव्हत्या. फक्त नगरसेविका मधुमिता नार्वेकर या महिला नगरसेविकेने आपला आवाज बुलुंद ठेवला होता. सत्ताधारी गटासमोर अनेकवेळा प्रश्‍न उपस्थित करून धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

जानेवारी किंवा मार्च २०२१ मध्ये राज्य निवडणूक आयोग पालिकेची निवडणूक घेणार असल्यामुळे  भाजपसमोर कॉंग्रेस, मगो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन आव्हान उभे करणार आहेत. तसेच आम आदमी पक्ष, शिवसेनासुध्दा उमेदवारांच्या शोधात आहे. म्हापसा पिपल्स युनियटन पुन्हा एकदा आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. म्हापशातील अनेक प्रभागातील युवक एकत्र येऊन म्हापसा युथ नावाची संघटना तयार केली आहे. म्हापसा युथसुध्दा उमेदवार  उभे करणार आहे.
पालिका निवडणुकीत भाजप प्रदेश समिती यंदा म्हापसा पालिका निवडणुकीची धुरा कुणाकडे देते याकडे म्हापसेकरांचे लक्ष आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांच्याकडे सुत्रे देतात की राज्य कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नगरसेवक पालिका कायद्याचे अभ्यासक संदीप फळारी यांच्याकडे सोपवितात याकडे लक्ष आहे, पण विद्यमान राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रीत केल्यास लक्षात येईल की संदीप फळारी यांच्याकडे नेतृत्व देण्यास आमदार तयार होणार नाहीत. आमदारांनी विद्यमान नगराध्यक्षासह आणखीन दोन नगरसेवकांना हाताशी धरून संदीप फळारी यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मंत्री मायकल लोबो यांच्या संपर्कात भाजपचे ३ नगरसेवक आहेत, तर विरोधी गटाचे दोन नगरसेवक आहेत अशी चर्चा म्हापशात आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणीतील ज्येष्ठ नेते मायकल लोबो यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांचे वजन वाढणार आहे. मायकल लोबो यांनी मागच्या एक वर्षांपासून म्हापशातील आजी माजी नगरसेवकाबरोबर चर्चा चालू केली आहे. तसेच म्हापशातील अनेक व्यापाऱ्यांशी त्यांनी थेट संपर्क साधून उमेदवाराची चाचपणी चालू केली आहे. कुचेली, करासवाडा, अन्साभाट, खोर्ली, फेअर आल्त, मरड, गावसवाडा, एकतानगर अशा भागातील युवकांची फळी मायकल लोबो यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिल्यास आव्हान उभे राहणार आहे. मायकल लोबो यांनी १० प्रभागामध्ये उमेदवार निश्‍चित केल्याचे 
समजते.

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर हेसुध्दा भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी काम करणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकरांच्या विरोधात प्रचारासाठी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. याचा वचपा काढण्याची व्यूहरचना त्यांनी आखली आहे. तसेच त्यांचा संबंध म्हापशातील शेकडो मतदारांशी आहे. पालिका निवडणुकीत मंत्री मायकल लोबो यांना माजी आमदार किरण कांदोळकरांचा पाठिंबा मिळू शकतो. तसेच भाजप नगरसेवकांच्या विरोधात काही भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे.

माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, म. गो. नेते व माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी युती केल्याचे समजते. या मंडळींना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना पाठिंबा देतील. संजय बर्डे, जितेश कामत यांनी म्हापसा शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मंडळींना मंत्री मायकल लोबो यांचा पाठिंबा मिळू शकतो. म्हापसा युथचे प्रवीण आसोलकर, गौरीश केणी, नेहाल शिरगावकर यांनी आपल्या पध्दतीने काम चालू ठेवले 
आहे.

कुचेली मैदान बचाव आंदोलन वेगळे रूप धारण करीत आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांनी कुचेली कोमुनिदादला उघड पाठिंबा दिल्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी कुचेली मैदान बचावाला उघड पाठिंबा न दिल्यामुळे नाराजी वाढली आहे. या मैदानाला तीन नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी जनतेला सहकार्य केले आहे. टाळेबंदीतसुध्दा मदतीचा हात दिला, पण स्थानिक आमदाराने कोरोना काळात जनतेला सहकार्य केले नाही ही नाराजी आहे. याऊलट कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी विठ्ठलवाडी युथ व नगरसेवक तुषार टोपले यांच्या सहकार्याने २२ टन भाजी स्वस्त दरात विकली. तसेच प्रत्येक कुटुंबाला १ किलो कांदा व अंडी मोफत दिली होती. त्यावेळी मंत्री लोबो स्वतः हजर होते.

यंदाच्या पालिका निवडणूकीत कोण कुठे जातो हे पाहावे लागेल. कोण कुणाच्या पॅनलमधून निवडणूक लढविणार हे निश्‍चित झाले नाही. भाजपच्या विद्यमान म्हापसा विकास आघाडीच्या विरोधात भाजपचेच ज्येष्ठ नेते युवा मोर्चा असणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहे. मागच्या २०१५ च्या पालिका निवडणुकीत भाजपच्या पॅनला ११ हजार मते मिळाली होती, तर विरोधी उमेदवारांना १० हजार ८०० मते मिळाली होती. यंदाची पालिका निवडणूका भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

संबंधित बातम्या