म्हापसा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बिनविरोध !

Mhapsa Mayor, Deputy Mayor unopposed!
Mhapsa Mayor, Deputy Mayor unopposed!

म्हापसा :  म्हापसा पालिकेचे (Mapusa Palika) नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या पदांसाठी अनुक्रमे शुभांगी वायंगणकर (shubhangi vaingankar) व चंद्रशेखर बेनकर (Chandrashekhar Benkar)  यांचे प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. पालिका मंडळाची उद्या २७ रोजी सकाळी विशेष सभा होणार असून, त्या बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करणे तेवढे बाकी आहे. या दोन्ही पदांसाठी अन्य कुणाचेही अर्ज आले नाहीत.

दरम्यान, म्हापसा उपनगराध्यक्षपदासाठी सध्या प्रभाग दोनचे नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांचे नाव चर्चेत होते. तसेच नगराध्यक्षपदी प्रभाग सतराच्या नगरसेवक शुभांगी वायंगणकर यांच्या नावावर या पूर्वीच शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, मंगळवारी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे समीकरणेच बदलली. सुधीर कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘म्हापशेकरांचो एकवोट’ गटातर्फे निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी मंगळवारी पणजी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, काही दिवसांपूर्वी त्याच गटातील नगरसेवक शुभांगी वायंगणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याशिवाय म्हापशेकरांचो एकवटच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अन्य एक अपक्ष नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी भाजपपुरस्कृत ‘म्हापसा विकास आघाडी’ गटाला  पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या पालिकेतील एकंदर राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या तरी मी भाजपपुरस्कृत गटाला पाठिंबा दिलेला आहे; मात्र, मी आजारी असल्याने भाजपप्रवेशाचे सोपस्कार नंतर करणार आहे, असे प्रकाश भिवशेट यांनी या सांगितले.

भाजमध्ये दाखल झालेले तीनही नगरसेवक माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘म्हापशेकरांचो एकवट’ गटाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्या गटातील अन्य एक नगरसेवक शुभांगी गुरुदास वायंगणकर यांनी या पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याशिवाय, अपक्ष नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी भाजपपुरस्कृत गटाला पाठिंबा जाहीर केल्याने या नवीन राजकीय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत.

या वीस-सदस्यीय पालिका मंडळात सध्या भाजपपुरस्कृत ‘म्हापसा विकास आघाडी’ची सदस्यसंख्या नऊवरून चौदावर पोहोचली आहे, तर ‘म्हापशेकरांचो एकवट’ची सदस्यसंख्या नऊवरून पाचवर घसरली आहे. मतमोजणी झाली तेव्हा ‘म्हापसा विकास आघाडी’ला नऊ जागा, ‘म्हापशेकरांचो एकवट’ला नऊ जागा, तर दोन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या.

सध्या सुधीर कांदोळकर यांच्या ‘म्हापशेकरांचो एकवट’ गटात त्यांच्यासह ॲड. शशांक नार्वेकर, डॉ. नूतन बिचोलकर, कमल डिसोझा व अन्वी कोरगावकर असे केवळ पाच नगरसेवक आहेत. आनंद भाईडकर हे अपक्ष नगरसेवक आहेत. भाजपचे उत्तर गोवा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराचा पराभव करून तारक आरोलकर निवडून आले होते व त्या वेळी त्या दोघांनी एकमेकांवर पराकोटीचे आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर आरोलकर बंधूंच्या भाजपप्रवेशाबाबत प्रतिक्रिया विचारली असता फ्रँकी कार्वाल्हो म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ज्यांना इच्छा असेल त्यांनी भाजपमध्ये अवश्य यावे. त्याबाबत माझे काहीच म्हणणे नाही. ते तिन्ही नगरसेवक म्हापसा शहराच्या तसेच स्वत:च्या प्रभागाच्या विकासासाठी कदाचित आले असावेत व ती चांगलीच बाब आहे असे मला वाटते. पालिका मंडळ व्यवस्थित चालावे, पक्षात नव्याने आलेल्यांनी म्हापसावासीयांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, एवढेच माझे म्हणणे आहे.

आणखी तिघे भाजपमध्ये, तर चौथ्याचा पाठिंबा!
भाजपविरोधी गटातून निवडून आलेल्या म्हापसा नगरपालिकेच्या तीन नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये  प्रवेश केला. प्रभाग सातचे नगरसेवक तारक आरोलकर, प्रभाग आठचे विकास आरोलकर व प्रभाग सोळाचे नगरसेवक विराज विनोद फडके अशी त्यांची नावे आहेत. त्याशिवाय, प्रभाग वीसचे नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी भाजपपुरस्कृत गटाला पाठिंबा दिला आहे. तेसुद्धा भाजपमध्ये रीतसर प्रवेश करणार होते. तथापि, ते सध्या आजारी असल्याने त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com