म्हापशातील ‘त्या’ परिसरात व्यावसायिकांना बंदी घाला

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

म्हापसा व्यापारी संघटनेचे मुख्याधिकारी, आमदारांना निवेदन

म्हापसा: म्हापसा नगरपालिका बाजारातील शंकुतलेचा पुतळा व त्या ठिकाणचा कारंजा असे बाजाराचे आकर्षण असल्यामुळे म्हापसा नगरपालिका मंडळाने शंकुतलेच्या परिसरात फेरी विक्रेत्यांना कायमस्वरुपी बंदी घालावी, या मागणीचे निवेदन म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व म्हापसाच्या आमदारांना सादर केले आहे.

म्हापसा पालिकेने बाजारपेठेत पे-पार्किंग व्यवस्था करून चांगले काम केले आहे. या नवीन व्यवस्थेमुळे म्हापशात बाहेरून येणाऱ्या लोकांना आपल्या गाड्या पार्किंग करून जाण्यास मिळत नाही. पार्किंग जागा उपलब्ध झाल्यामुळे बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात येतील. फक्त ज्या व्यक्तीने पे-पार्किंग ठेकेदारी घेतली आहे. त्याला व त्याच्या कर्मचाऱ्यांना लोकांशी शिस्तीने वागण्यास सांगण्‍याची गरज आहे. लोकांशी ही मंडळी गैरवर्तन करतात, तेव्हा पालिकेने कारवाई केली पाहिजे व त्यांना समज देण्याची गरज आहे. शंकुतलेच्या परिसरात फेरी विक्रेत्यांना कायमची बंदी घातल्यानंतर म्हापसा पालिकेने या परिसराचा सुशोभीकरणाचे काम लवकर हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठेत ‘कोविड-१९’च्या काळात पालिकेने ४९-४९-४९ या तत्त्वानुसार व्यवसाय करण्यास परवानगी दिली पाहिजे. त्यांना दिलेल्या जागेत व्यवसाय करण्यास सांगितले पाहिजे.

गोमंतकीय महिला आपल्या शेतातील पीक विक्रीसाठी आणतात त्यांना प्रथम संधी दिली पाहिजे. बिगर गोमतंकीय फेरी विक्रेत्यांना संधी देता कामा नये. गोमंतकीय जनतेचे हीत प्रथम पाहण्याची मागणी केली गेली आहे.
 
म्हापसा पालिकेने बाजारातील व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील माल किंवा साहित्य आणण्यासाठी त्याच्या वाहनांना सकाळी सात ते सकाळी दहा व दुपारी एक ते संध्याकाळी चार या वेळेत परवानगी दिली पाहिजे.

तशा प्रकारची सूचना पालिका कर्मचाऱ्यांना करण्याची तसेच बाजारात घातलेल्या गेटची चावी जवळच्या दुकानदारांकडे ठेवण्याची मागणी केली आहे.

‘कोविड-१९’मुळे म्हापसा पालिका बाजारपेठेचे वाईट अवस्था झालेली आहे. अनेक व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे पालिकेने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सहकार्य करून त्याच्या व्यवसाय पुन्हा सुरळीत चालावा यासाठी मदतकार्य केले पाहिजे. 

तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला त्याच्या दुकानातील वस्तू बाहेर ठेवण्यासाठी पदपाथावर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेने केली आहे. म्हापसा व्यापारी संघटनेच्या निवेदनावर अध्यक्ष आशिष शिरोडकर, सचिव आसिस कार्दोज, उपसचिव सुदेश राऊत, खजिनदार अमर कवळेकर, उपखजिनदार विशाल फळारी, सदस्य श्रीपाद सावंत, रुपेश शिंदे, श्रीपाद येंडे, राजेंद्र पेडणेकर, मोहम्मद मोतिवाला, पांडुरंग सांवत, पीटर मास्कारेन्हस, नागेश मयेकर यांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या