म्हापसा: पाणी तुंबण्याच्या घटना यंदा म्हापशात नाहीत

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

ज्योसुआ डिसोझा : पालिकेला शासकीय यंत्रणांचे पूर्ण सहकार्य

म्हापसा: म्हापसा नगरपालिकेने विविध शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने योग्य वेळी विविध कामे करवून घेतल्याने पाणी तुंबण्याच्या घटना यंदा म्हापशात घडल्या नाहीत, असा दावा आमदार  ज्योसुआ डिसोझा यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला.

गोव्यातील अन्य भागांत थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात जरूर घडल्या. तथापि, म्हापसा विधानसभा मतदारसंघात ही समस्या फारशी जाणवली नाही, असेही ते म्हणाले. म्हापसा शहराच्या कोणत्याही भागात पाणी तुंबू नये यासाठी सर्व गटारांतील गाळ पावसाळ्यापूर्वीच पूर्णत: बाहेर काढल्यानेच पाणी तुंबण्याच्या घटना येथे घडल्या नाहीत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

श्री. डिसोझा पुढे म्हणाले, गावसवाडा प्रभागातील सखल भागांत दरवर्षी पावसाचे पाणी साठून राहायचे; परंतु, यंदा पावसाळ्यापूर्वीच तेथील जुनाट-पारंपरिक ओहोळांतील गाळ काढून टाकल्याने ती समस्यासुद्धा नाहीशी झाली आहे. आवश्यक असलेली विविध कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घेण्यात म्हापसा पालिका सरकारच्या पाठबळाने यशस्वी ठरली. वीजवाहिन्यांना व्यत्यय आणणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे, गटारांतील व नाल्यांतील गाळ उपसणे, काही ठिकाणी नवीन गटारे उभारणे ही कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात आली होती. म्हापसा नगरपालिका मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते व वीज खाते अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून ती कामे करण्यात आली, असेही श्री. डिसोझा यांनी नमूद केले.

म्हापशातील महारुद्र मंदिर ते करासवाडा जंक्शन आणि म्हापसा न्यायालय जंक्शन ते पेडे या दोन्ही रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण केले असता त्या वेळीदेखील पावसाचे पाणी रस्त्यांवर साठले जाणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Tags