...तर लोबोंच्या दोन्ही रिसॉर्टवर हातोडा पडणार

विश्‍वजीत राणेंचा एल्गार; मायकल लोबोंना पूर्वीच्या पॉटरीच्या दुकानात कामाला पाठवणार असल्याचा टोला
...तर लोबोंच्या दोन्ही रिसॉर्टवर हातोडा पडणार
Michael Lobo NewsDainik Gomantak

पणजी : नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यात बाह्यविकास आराखड्यावरून पेटलेल्या संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे. मंत्री राणे यांनी लोबो यांच्या कळंगुट येथील ‘हॉटेल नाझरी रिसॉर्ट’ आणि ‘बागा डेक’ या दोन्ही आस्थापनांत मोठ्या प्रमाणात कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगितले. ही दोन्ही हॉटेल्स जमीनदोस्त का करू नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही दोन्हीही रिसॉर्टस आपण मंत्रिपदी असेपर्यंत पाडणारच. ते यापूर्वी ज्या पॉटरीच्या दुकानात काम करत होते, त्या दुकानात ते परत जातील याची काळजी घेऊ, असे राणे यांनी ठणकावून सांगितले. (Michael Lobo News)

यावर पत्रकार परिषद घेऊन लोबो म्हणाले, की यापूर्वी तयार केलेले बाह्यविकास आराखडे (ओडीपी) सध्याच्याच अधिकाऱ्यांनी साक्षांकीत केले आहेत. त्यामुळे याविरोधात कारवाई झाल्यास आपण न्यायालयात जाऊ. राज्यात नवे सरकार आल्यानंतर नगरनियोजन आणि शहर विकास मंत्री विश्वजीत राणे यांनी नगरनियोजन खात्यात आमूलाग्र बदलांची घोषणा करत यापूर्वी नियोजन विकास प्राधिकरणाने (पीडीए) जाहीर केलेले प्रादेशिक आराखडे आणि बाह्यविकास आराखडे रद्द करत या संपूर्ण आराखड्यांची विशेष समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी या आराखड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नगरनियोजन कायदा कलम 17 ए आणि 17 बी याबरोबरच महसूल कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या विकास आराखड्यांनुसार केलेल्या शिफारशी, दिलेल्या मंजुरी रद्द करत असल्याचे पत्र नगरनियोजन खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. अशातच नगरनियोजन मंडळाची बैठक झाली. यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

लोबो यांनी कोर्टात जावेच

नगरनियोजन खात्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याने रद्द केलेले ओडीपीमधील शिफारसी, मंजुरीपत्रे, सनद रद्द केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी यासंदर्भात कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत विचारले असता, राणे म्हणाले, त्यांनी न्यायालयात जावेच. त्यामुळे त्यांनी नक्की कोणती बेकायदेशीर कृत्ये केली आहेत, हे न्यायालयातही स्पष्ट होईल.

नगरनियोजन कायद्यातील अधिनियमांत होणार बदल

येत्या विधानसभेत नगरनियोजन खात्याच्या विविध अधिनियमांमध्ये बदल करणे ही काळाची गरज आहे. यामधील अनेक नियम रद्द करून नवे नियम करणे महत्त्वाचे असल्याने काही बदल करण्यात येतील. प्रामुख्याने राज्याचा वारसा स्थळे, संस्कृती आणि गोंयकारपण टिकवण्यासाठी हे बदल करण्यात येतील. वारसा स्थळांच्या भोवती 100 मीटर बफर झोन बनवून येथील बांधकामांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादण्यात येतील, असे राणे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com