गोव्याच्या माजी पर्यटनमंत्र्यांचा काँग्रेसच्या दिशेने कल

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

 माजी पर्यटनमंत्री व नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांचा काँग्रेसच्या दिशेने कल असून लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मडगाव: माजी पर्यटनमंत्री व नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांचा काँग्रेसच्या दिशेने कल असून लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नुवे व बाणावली या दोन्ही मतदारसंघात आपला प्रभाव असून दोन्हीपैकी एका मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

पाशेको हे सध्या विदेशात असून या महिन्या अखेर ते गोव्यात परतणार आहेत. ‘मी  काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात आहे. लवकरच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसमध्ये मला प्रभावी असे एक पद मिळणार आहे,’ असे पाशेको यांनी या प्रतिनिधीला मोबाईलवरून संपर्क साधला असता सांगितले.  ‘सध्याचे राजकीय वातावरण काँग्रेसला अनुकूल आहे, पण स्थानिक नेत्यांनी स्थिती योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात काँग्रेसचा एक भव्य मेळावा आपण आयोजित करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

पाशेको हे गेली २० वर्षे गोव्याच्या राजकारणात असून २००३ ते २०१७ असे सलग चौदा वर्षे ते आमदार होते. भाजप व काँग्रेसच्या युती सरकारात ते मंत्रीही होते. युगोडेपा, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा विकास पार्टी, गोवा सुराज पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी त्यांचा नुवे मतदारसंघात पराभव केला होता.

संबंधित बातम्या