माध्‍यान्‍ह आहार पुरविणाऱ्या स्‍वयंसहाय्‍य गटांना कामाची फेरविभागणी

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

विद्यार्थ्यांना मानधनाऐवजी देखभाल दुरुस्‍ती योजनेत सामावणार
 

पणजी

माधान्ह आहार पुरवणाऱ्या महिला स्वयंसहाय्य गटांना कामाची फेरविभागणी करण्यात येणार आहे. सर्वांना समान काम मिळावे, असा उद्देश यामागे आहे. याशिवाय अनुदानित मराठी व कोकणी माध्यमातील प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यामागे मासिक चारशे रुपये ही योजना बंद करून त्यांना देखभाल दुरुस्ती योजनेत सामावून घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने मंत्रालयात आज वरिष्ठ पातळीवरील बैठक घेतली. त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आली. या बैठकीत या वर्षी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात कसे जाता येईल, याचे निकष ठरवण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. शिक्षण खाते, तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी सेवेची संधी देण्यासाठी भरती नियमांत बदल करण्याच्या शक्यतेवरही विचार करण्याचे ठरवण्यात आले आहे. ज्या शाळांत व्यावसायिक तीन अभ्यासक्रम सुरू आहेत, तेथे अन्य अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असेही ठरवण्यात आले आहे.
या बैठकीस शिक्षण सचिव नीला मोहनन, शिक्षण संचालिका वंदना राव, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्‍या मानधनात वाढ
पूर्व प्राथमिक विद्यालयांना गोवा शालेय शिक्षण कायदा व नियम लागू केले जाणार आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अर्धवेळ शिक्षकांना मासिक १६ हजार रुपये मानधनाऐवजी २२ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षकांना मासिक २५ हजार रुपये वेतन देण्याचे ठरवण्यात आले. व्यावसायिक शिक्षकांची अर्धवेळ, दुहेरी अर्धवेळ, पूर्णवेळ कंत्राटी या पद्धती बंद करून सर्वांना कंत्राटी शिक्षक ही एकमेव श्रेणी लागू करण्याचेही ठरवण्यात आले. गेली पाच वर्षे सरकारी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयांत तासिका तत्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांचे वेतन २५ हजार रुपये करण्याचे ठरवण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या