गोव्यातील 285 अंगणवाड्यांचे स्थलांतर

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यातील अंगणवाड्या शिक्षण खात्याच्या बंद पडलेल्या शाळा वा अन्य रिकाम्या जागी हलविण्याचे प्रयत्न चालू असून आतापर्यंत 285 अंगणवाड्या अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण खात्याकडून देण्यात आली आहे.

पणजी : राज्यातील अंगणवाड्या शिक्षण खात्याच्या बंद पडलेल्या शाळा वा अन्य रिकाम्या जागी हलविण्याचे प्रयत्न चालू असून आतापर्यंत 285 अंगणवाड्या अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण खात्याकडून देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अंगणवाड्यांसाठी स्वयंपाकगृह, स्टोअर रूम व प्रसाधन कक्ष यांनी युक्त अशा सुसज्ज नवीन इमारती उभारण्याचे प्रयत्नही चालू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यामध्ये एकंदरीत 1262 अंगणवाड्या असून त्यातील 89 अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका, तर 109 अंगणवाड्यांमध्ये मदतनीस नाही, अशी माहिती मिळाली आहे.

522 अंगणवाड्या सरकारी जागेत
खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीमुळे वा आरोग्याच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या 89, तर मदतनीसांच्या 109 जागा रिक्त झालेल्या असून या जागा भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे. एकंदरित 740 अंगणवाड्या भाड्याच्या जागेत चालत असून 522 अंगणवाड्या या सरकारी प्राथमिक शाळांसह सरकारी वा भाडे नसलेल्या जागेत चालत आहेत.

अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या मुलांची नीट काळजी घेण्याबरोबर त्यांना पोषक व प्रथिनेयुक्त आहार मिळावा, याकडे लक्ष देण्यात येते. त्याअंतर्गत भाज्यांच्या खरेदीसाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकाला महिन्याकाठी एक हजार रुपयांची रक्कम दिली जाते. याशिवाय परिसरातील गरोदर महिलांना पोषक आहार पुरविला जातो. त्याचप्रमाणे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात तसेच स्वच्छतेविषयी जागृती करण्यात अंगणवाडी सेविकांचा सहभाग असतो. अंगणवाडी सेविकांकडून स्वच्छतेबरोबर वाहतूक नियम, बेटी बचाव मोहीम याविषयीही जागृती केली जाते. प्रत्येक अंगणवाडीकडून दर महिन्याला दोन अशा प्रमाणे गेल्या वर्षभरात राज्यातील 1262 अंगणवाड्यांकडून जवळपास 37 हजार कार्यक्रम केले आहेत.

...तर कुंकळ्ळीतील त्‍या तरुणाचा जीव वाचला असता? 

‘ॲप’ च्या मदतीने नजर
जन्मलेल्या मुलांची नीट वाढ होत आहे की नाही, ती मुले आवश्यकतेपेक्षा जास्त वजनाची आहेत की कमी वजनाची आहेत तसेच कुपोषित आहेत का? यावरही अंगणवाडी सेविकांकडून नजर ठेवली जाते आणि आता त्यासाठी ॲपची मदत घेतली जाते. स्तनपानासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करणारे साहित्य पुरविले जाते. याशिवाय मूल होण्यापूर्वी आणि मूल झाल्यानंतर कशी निगा घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. संबंधित मातेशी ‘एसएमएस’द्वारे संपर्क साधून मुलाला प्रथिनेयुक्त आहाराची कशी गरज आहे, त्याविषयी माहिती दिली जाते, असे नाईक यांनी सांगितले.

मोफत कोरोना तपासणी करणारे गोवा देशातील पहिले राज्य 

संबंधित बातम्या