दूध दर वाढ एक रुपया नव्हे, ३ रुपये द्या!; दूध उत्पादकांची गोवा डेअरी व्यवस्थापनाकडे मागणी

दूध दर वाढ एक रुपया नव्हे, ३ रुपये द्या!; दूध उत्पादकांची गोवा डेअरी व्यवस्थापनाकडे मागणी
Milk price not to increase by one rupee but give 3 rupees

फोंडा: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले प्रती लिटर तीन रुपये आम्हाला द्या, एक रुपया नकोच, असे राज्यातील दूध उत्पादकांनी गोवा डेअरी व्यवस्थापनाला सुनावले. फोंड्यात आज (रविवारी) आयोजित करण्यात आलेल्या दूध उत्पादकांच्या पत्रकार परिषदेत दूध उत्पादकांच्या दरवाढीसंबंधी बोलताना राज्यातील दूध उत्पादकांना संपवण्याचा प्रकार गोवा डेअरीकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला. 

यावेळी दूध उत्पादक अनुप देसाई, संजीव कुंकळ्येकर, नीतिन प्रभुगावकर, विश्‍वास सुखटणकर, वैभव परब व प्रमोद सिद्धये आदी उपस्थित होते. 

गोवा डेअरी व्यवस्थापनाने येत्या १ सप्टेंबरपासून डेअरीशी संबंधित दूध उत्पादकांना दुधातील फॅटनुसार प्रती लिटर ७५ पैसे ते २ रुपया देण्याचे जाहीर केले आहे, मात्र गोवा डेअरीने जाहीर केलेल्या दूध दरवाढीत सरकारी अनुदानाचा भर असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी गेल्या मार्चमध्ये झालेल्या तत्कालीन प्रशासक अरविंद खुटकर व दूध उत्पादकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रती लीटर तीन रुपये दरवाढ त्वरित द्यावी, अशी मागणी या दूध उत्पादकांनी केली आहे. 

दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने दूध व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली होती. त्यावेळी दूध उत्पादकांनी प्रती लीटर चार रुपये दरवाढीची मागणी केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी तीन रुपये दरवाढ मान्य करून १ एप्रिलपासून ती लागू करण्याचा निर्देश गोवा डेअरी व्यवस्थापनाला केला होता, मात्र या आदेशाला गोवा डेअरी व्यवस्थापनाकडून कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली असून कमाल १ रुपया प्रती लीटर दरवाढ करून दूध उत्पादकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार प्रशासकीय समितीने केल्याचे सांगून मुळात ही तीन सदस्यीय प्रशासकीय समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप या दुग्ध उत्पादकांनी केला. याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी प्रती लीटर तीन रुपये दरवाढ दूध उत्पादकांना मान्य होती, मात्र कोरोना महामारीमुळे या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दूध उत्पादकांनी गृहीत धरले होते, आता एक रुपया दरवाढ ही नुसती धूळफेक असून गोवा डेअरीचा प्रशासकीय कारभारच भोंगळ असल्याची टीका अनुप देसाई व इतरांनी केली.  

प्रती लिटर तीन रुपये ऐवजी एक रुपयांवर आणणे म्हणजे दूध उत्पादकांना भीक घातल्यासारखी असल्याचा आरोप संजीव कुंकळ्येकर यांनी करून आधी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करा, असे सांगितले. 

नीतिन प्रभुगावकर यांनी गोवा डेअरीत दूधमापन यंत्रणा व्यवस्थित नसल्याचे सांगून नवीन यंत्रणा आठ महिने झाले तरी अजून बसवली जात नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून डेअरीचे प्रशासन चालवतो कोण, असा सवालही या दूध उत्पादकांनी केला असून सातत्याने प्रशासक बदलण्याचे कारण काय, असा सवालही केला आहे. गोवा डेअरीच्या हिताशी तत्कालीन प्रशासक संतोष कुंडईकर तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. रघुनाथ धुरी यांनी काही निर्णय घेतले होते, त्याचीच री ओढली जात असून नवीन काहीच नाही, असेही दूध उत्पादक म्हणाले. कोरोनामुळे दूध उत्पादक थंड बसले आहेत, या दूध उत्पादकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नुकसानी तरीही नोकरभरती...!
गोवा डेअरी नुकसानीत चालत असल्याचे सांगण्यात येत असूनही नवीन नोकरभरती केली जात आहे. मागच्या काळात केलेल्या खोगिरभरतीचा आर्थिक ताण डेअरीवर आहे. काही लोक अजूनही बसून पगार खाताहेत, एक शिफ्ट बंद केल्याने कामगार जास्त ठरले आहेत. या लोकांनाच त्यांच्या पात्रतेनुसार काम द्या, असे सांगून नवीन नोकरभरतीसंबंधी गोवा डेअरी प्रशासनाने राज्यातील दूध संस्थांना कळवले असून त्यांच्यातील इच्छुकांना अर्ज करण्यास  सांगितले आहे. मात्र या नोकरभरतीत ज्या अटी आहेत, त्या पूर्ण करणे दूध संस्थाशी संबंधितांना शक्‍य नाही, त्यामुळे नव्याने नोकरभरती ही दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com