आक्रमक पवित्रा घेत खाणी सुरू करण्याची मुदत खाण अवलंबितांनी दिली सरकारलाच

UNI
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडून आजवर ‘तारखा’ जाहीर करण्यात येत होत्‍या. याविषयीच्या खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारखा निश्चित केल्या जात आहेत. आता मात्र खाण अवलंबितांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या १५ मार्चपर्यंत खाणी सुरू करण्याची मुदत सरकारला दिली.

पणजी - खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडून आजवर ‘तारखा’ जाहीर करण्यात येत होत्‍या. याविषयीच्या खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारखा निश्चित केल्या जात आहेत. आता मात्र खाण अवलंबितांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या १५ मार्चपर्यंत खाणी सुरू करण्याची मुदत सरकारला दिली. न पेक्षा खाण भागातील यंत्रे, बार्ज, वाहने राजधानीत आणून सर्व व्यवहार ठप्प करण्याचा इशारा खाण अवलंबितांनी आज आंदोलक बनून दिला.

सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप 
खाण अवलंबितांनी आज सत्ताधाऱ्यांवर बरेच तोंडसुख घेतले. खनिजाच्या ई लिलावातून आमदार, मंत्र्यांना होत असलेल्या लाभाची जंत्रीही यावेळी झालेल्या सभेत सादर करण्यात आली. सरकार खाणी राज्याबाहेरील उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी वावरत आहे, असा थेट आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या भाजपकडून या आरोपांचा इन्कार करत सरकारने खाण अवलंबितांना कठीण काळात दिलेल्या मदतीच्‍या हाताची आठवण करून देणारे पत्रक अखेर जारी करण्यात आले. 

बसस्‍थानकापासून मोर्चाला सुरवात
गोव्यातील खाणी १५ मार्चपर्यंत सुरू करा, नपेक्षा १६ मार्च रोजी राज्यातील खाण क्षेत्रातील हजारो वाहने पणजीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणू व चक्काजाम केला जाईल, असा इशारा खाण अवलंबितांनी सोमवारी दिला. राज्यातील खाणी त्वरित सुरू कराव्यात, या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे अडीच हजार खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत मूक मोर्चा काढला. पणजी बसस्थानकापासून सुरू झालेला हा मोर्चा आझाद मैदानवर आल्यानंतर तेथे त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. 

आता लेखी आदेशाशिवाय माघार नाहीच - गावकर
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याचे कारण सरकारने आम्हाला सांगू नये, असेही पुती गावकर म्हणाले. सरकारने १५ मार्चपूर्वी खाणी सुरू करण्याचे लेखी आदेश काढावेत. तरच वाहन मोर्चा टळू शकतो, असेही यावेळी गावकर यांनी स्पष्ट केले. गेली तीन वर्षे सरकार फक्त खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन देत आहे. यापुढे आश्‍वासने नको, तर कृती हवी, असे सांगून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, ते पाळले नाही. यावेळी बार्ज संघटनेचे अतूल जाधव, चंद्रकात गावस, ट्रकमालक संघटनेचे नेते सुरेश देसाई, महेश गावस, बालाजी गावस, देवानंद परब, सुर्या नाईक यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

अन्‍यथा मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यावर धडक
खाण अवलंबित संघटनेचे निमंत्रक पुती गावकर यांनी सरकारला कडक अंतिम इशारा देताना सांगितले की, सरकारने काहीही करून राज्यातील खाणी १५ मार्चपर्यंत सुरू कराव्यात. नपेक्षा खाण अवलंबितांचे सुमारे ६ हजार ट्रक, १ हजार यंत्रे व इतर वाहने आल्तिनो - पणजी येथील मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आणून ठेवली जातील. आमची कर्जे फेडा आणि आम्हाला आर्थिक मदत करा, असा इशारा श्री. गावकर यांनी दिला. सरकारने खाण महामंडळ स्थापन करावे, किंवा गोवा दमण दीव खाण कायद्यात बदल करून खाणी २०३७ पर्यंत सुरू राहाव्‍यात, अशी तरतूद करावी.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या