गोव्याच्या खाणपट्ट्यातील अंदाधुंदी सुरूच..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

General राज्यातील खनिज खाणी कायदेशीररीत्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. केवळ लिलावाचा आणि स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक सध्या सुरू करण्यात आली असून येत्या जानेवारी महिन्यापर्यंत ही वाहतूक करण्यास न्यायालयाने मुदत दिली आहे.

पाळी :  राज्यातील खनिज खाणी कायदेशीररीत्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. केवळ लिलावाचा आणि स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक सध्या सुरू करण्यात आली असून येत्या जानेवारी महिन्यापर्यंत ही वाहतूक करण्यास न्यायालयाने मुदत दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर खनिज वाहतुकीसाठी सध्या अहमहमिका सुरू असून सुरू करण्यात आलेल्या खाणींवर काम मिळवण्यासाठी धडपड करण्यात येत आहे. त्यातच काल (बुधवारी) खुद्द पाळीतील एक युवक आणि युवती खाण ट्रकाला धडकल्याने मृत्युमुखी पडल्याने खाणींबद्दल सर्वसामान्य लोकांना आस्थाच राहिलेली नाही. 

राज्यातील सर्वांत मोठा खाण व्यवसाय दुसऱ्यांदा बंद केल्यानंतर अजूनपर्यंत तरी सुरू झालेला नाही. सुरवातीला लीलावाचा खनिज माल वाहतूक करण्यात आला. त्यानंतर आता स्वामित्व धन अदा केलेला व खाणींवर काढून ठेवण्यात आलेला खनिज माल सध्या वाहतूक करण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश खाण कंपन्या सध्या बंदच आहेत, मात्र ही खनिज वाहतूक सुरू झाल्याने खाणींवर मला मिळेल की तुला मिळेल काम अशी स्पर्धा ट्रकचालक तसेच मशिनरीवाल्यांत सुरू आहे. काम कमी त्यात स्पर्धक जास्त अशी स्थिती असल्याने खाण कंपन्यांचे अधिकारीही वैतागले आहेत. येत्या जानेवारीपर्यंत काम मिळाले तर पुढे काय, हा प्रश्‍न आहेच, तरीही प्रत्येकजण खाणींवर आपापल्या ट्रकांना काम मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. 

पाळी भागात अनेक खाण कंपन्या कार्यरत आहेत. या खाण कंपन्या मागच्या साठ ते सत्तर वर्षे हा व्यवसाय करीत आहेत, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने खाण कंपन्या आणि बडा उद्योग असूनही पाळी भागातील लोक मात्र अजून सधन झालेले नाहीत. जे कुणी सधन आहेत, ते अधिकच सधन झाले, आणि जे गरीब आहेत, ते अधिकच निर्धन झाले. खाण व्यवसायातून कुणी कमावले आणि कुणी गमावले याचा लेखाजोखा मांडला तर खाणीशी संबंध नसलेल्यांनी बक्कळ पैसा कमावला, मात्र प्रत्यक्षात ज्यांनी खाण पट्ट्यात आयुष्य घालवले त्यांचे जीवन अधिकच बदतर झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

काल झालेला अपघात हा तसे म्हटले तर खनिज माल वाहतुकीसाठी अपशकून ठरला असून खनिज वाहतुकीत सुसूत्रता येण्यासाठी या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिस आणि विशेषतः वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी खाण भागातील वाहतूक व्यवस्थेतील अंदाधुंदी रोखून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 

उसगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना हवा दिलासा..!

बाराजण - उसगाव येथे काल (बुधवारी) झालेल्या अपघातात एक युवक आणि एक युवती ठार झाली. या दोन्ही मृतांचे कुटुंब गरीब आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ही दोघेही फोंड्यातील खाजगी आस्थापनात कामाला होती. तुटपुंजा पगार का होईना पण संसाराला हातभार लागत असल्याने दोन्ही कुटुंबाची रोजीरोटी चालत होती, पण आता कमावते हातच गेल्याने दोन्ही कुटुंबे हलाखीत सापडली आहेत. या दोन्ही कुटुंबांना खाण कंपन्या अथवा खाण निधीतून आवश्‍यक आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 

खाण बंदीनंतर अपघात नियंत्रित
राज्यात गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून खाण व्यवसाय सुरू आहे. या खाण व्यवसायात मशिनरीचा जास्त समावेश असून प्रत्यक्ष खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रकांची आवश्‍यकता लागते. राज्यात आतापर्यंत किमान सहा ते सात हजार ट्रक प्रत्यक्ष खाण व्यवसायाशी निगडित असून मुख्य म्हणजे जास्तीत जास्त खेपा मारण्यासाठी खाण बंदीपूर्वी वाहतुकीत जी अंदाधुंदी आली, त्यामुळेच सर्वात जास्त अपघात हे खाण पट्ट्यातच नोंद झालेले आहेत. या खाण पट्ट्यातील अपघातांमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले असून कमावते पुरुषच नाहिसे झाल्याने लोकांचे संसार देशोधडीला लागले. पण दुर्दैवाची बाब म्हणजे कोणत्याही खाण कंपन्यांनी याबाबतची जबाबदारी स्विकारली नाही. खरे म्हणजे २०१२ मध्ये खाण बंदी आल्यानंतर खाण पट्ट्यातील अपघात नियंत्रित झाले. अपघातांचे प्रमाण हे कमी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थाही व्यवस्थित निभावली गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

राज्यातील खाण कंपन्यांच्या संघटनेने किंवा जिल्हा खाण निधीतून उसगावातील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी.
- दिलीप राजाराम नाईक (बाराजण - उसगाव)

राज्याला आणि केंद्र सरकारला मोठा महसूल उपलब्ध करून देणाऱ्या खाण उद्योगाने मात्र खाणपट्ट्यातील अनेक संसार उद्‌ध्वस्त केले. उसगावचा अपघात हा काही नवीन नाही, यापूर्वी अशाप्रकारचे अपघात खाण उद्योगांमुळे घडले आहेत. त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही.
- सोमनाथ जना गावकर (धारबांदोडा)

अधिक वाचा : 

गोव्यातील माजी पोलिस उपनिरिक्षक गुडलरविरूद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल

महापालिका निवडणुकीत ८० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

गोव्यातील किनारपट्ट्यांवर वाढला जेलीफिश चा धोका

संबंधित बातम्या