खाणक्षेत्रातील पंच राज्‍यपालांना भेटले

अवित बगळे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

आर्थिक बाबतीत अभ्यास झाला तरी खाणकाम बंदीचा त्या भागातील जनतेच्या मानसिक आरोग्यावर कोणता परिणाम झाला आहे, याचा अभ्यास केला गेलेला नाही. बॅंका कर्ज परतफेडीसाठी तगादा लावत आहेत. त्यातच बेरोजगारी वाढली आहे.

पणजी

राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विनंती करण्यात आली. खाण भागातील पंचांनी आज राज्यपालांची भेट घेतली आणि खाण भागातील जनतेची आर्थिक, मानसिक कोंडीतून सुटका करण्यासाठी लवकरात लवकर खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राज्यपालांनी आपणास या विषयाची माहिती असून खाणी सुरू होणे राज्याच्या हिताचे असल्याचे नमूद केले.
या पंचासोबत राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेले ॲड. अमेय काकोडकर म्हणाले, खाण भागातील जनतेला आता पर्यायी रोजगार मिळू शकत नाही. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, याविषयी सरकारने पुरेसा अभ्यास केला आहे. सरकारला पाच हजार कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. आर्थिक बाबतीत अभ्यास झाला तरी खाणकाम बंदीचा त्या भागातील जनतेच्या मानसिक आरोग्यावर कोणता परिणाम झाला आहे, याचा अभ्यास केला गेलेला नाही. बॅंका कर्ज परतफेडीसाठी तगादा लावत आहेत. त्यातच बेरोजगारी वाढली आहे.

खाणबंदीमुळे लोक नैराश्‍‍याच्‍या गर्तेत
खाणबंदी व त्‍यानंतर टाळेबंदीमुळे खाण अवलंबित नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. कोविड महामारीच्या काळात यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे. लोक घरातच थांबून आहेत, त्यामुळे नैराश्यामुळे घरातच भांडणे लागत आहेत. हे सारे बंद करण्यासाठी रोजगार निर्माण करणे आणि त्यासाठी खाणी सुरू करणे हाच एकमेव उपाय सध्याच्या घडीला आहे. त्याविषयी आता सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे.
ते म्हणाले, पंच हे लोकांचे खरेखुरे प्रतिनिधी असतात. कारण, लोकांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून दिले आहे. खाणकाम बंदीचा थेटपणे दीड लाख जनतेवर परिणाम झाला आहे. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पंचायतींनी मांडलेल्या भूमिकेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. या साऱ्याची माहिती आज आम्ही राज्यपालांना दिली. राज्यपालांनाही मुद्दा पटला आहे. गोमंतकीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी खाणी सुरू झाल्या पाहिजेत, असेही त्यांचे मत आहे. राज्यपालांना आज आम्ही भेटलो. यापूर्वीही त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता. त्यांच्या मते गोव्याची अर्थव्यवस्था सुरू होण्यासाठी खाणी लवकर सुरू होणे गरजेचे आहे. त्यांनी आजही त्याचबाबत पुनरुच्चार केला.

 

 

संबंधित बातम्या