खाणबंदीमुळे शहरी आर्थिक व्यवहारावर झाला परिणाम!

प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

ग्रामीण भागासह शहरांतीलही खरेदी मंदावली, ट्रक व्यावसायिकांची बॅंकांतील कर्जे थकली

फोंडा राज्यात दोनवेळा खाणबंदी आल्यानंतर सरसकट सगळ्याच व्यवहारावर विपरीत परिणाम झाला. एक म्हणजे राज्याला आणि केंद्राला भरभक्कम आर्थिक महसूल प्राप्त करून देणारा स्त्रोतच आटला गेला. त्यामुळे विशेषतः राज्यातील महसुलावर ज्या विकासात्मक प्रक्रिया होत्या, त्यांना चाप बसला. याशिवाय खाण भागाला जवळ असलेल्या विविध शहरांतील आर्थिक व्यवहारावरही विपरीत परिणाम जाणवला. 

राज्याचा प्रमुख उद्योग ठरलेल्या खाण व्यवसायावरील बंदीमुळे अनेक घटकांवर हा परिणाम जाणवला. खाण भागातील दुकानदार तर मेटाकुटीला आले आहेत. खाणीशी संबंध नसलेल्या पण खाण भागात असलेल्या विविध दुकानांना खाण बंदीची झळ जाणवली. खाणींवर काम करणारे कामगार आणि खाणीशी संबंधित असलेल्या ट्रक, मशिनरी तसेच या ट्रक व यंत्रांवर काम करणारे कामगार आणि अन्य घटकांच्या खिशात पैसा असल्यामुळे लोक खरेदीसाठी बिनधास्त बाहेर पडायचे. पण खाणी बंद झाल्यामुळे खिशातील आर्थिक गंगाजळीच नाहिशी झाली. त्यामुळे खायचे वांदे निर्माण झाले. 

राज्यात सावर्डे ते मोले, रिवण ते धारबांदोडा, उसगाव, पाळी, वेळगे, होंडा, आमोणा, सत्तरी, डिचोली आदी भागात खाण व्यवसाय गेली अनेक वर्षे चालतो. या खाण व्यवसायावर खाण भागाबरोबरच इतर अनेक भागातील लोकही कामावर आहेत. खाणीशी संबंधित ट्रक, मशिनरी व इतर अनेक खाणीशी पूरक असे व्यवसायही हे लोक करतात. त्यामुळे खाण भागातील दुकाने व इतर अनेक आस्थापनांना गिऱ्हाईक मिळत होते. 

खाण भागात असलेली गॅरेजेस, सुटे भाग दुकानवाले, पेट्रोल पंप, चहा रेस्टॉरंटस्‌, बारवाले, गाडे व इतर छोटी मोठी आस्थापने खाणी सुरू होत्या, त्यामुळे या सर्व आस्थापनांतील लोक रोजीरोटी चालवत होते. पण खाणी बंद झाल्यानंतर आर्थिक स्त्रोतच नाहिसा झाल्याने सर्वांवर बेरोजगारीची आफत आली. 

खाण भागाला जवळ असलेल्या फोंडा, सावर्डे, कुडचडे, सांगे, साखळी, होंडा, डिचोली, वाळपई तसेच इतर शहरातही खाण भागातील लोकांमुळे आमदनी चांगली व्हायची. खाण भागाबरोबरच पणजी, मडगाव, म्हापसा आणि वास्को भागातही खाण व्यवसायामुळे आर्थिक व्यवहार चांगले चालायचे, पण खाणी बंद झाल्यानंतर सगळीकडेच व्यवहारांवर परिणाम जाणवला, त्यामुळे सर्वस्वी खाण व्यवसायावर विसंबून राहिल्यामुळे नेमकी काय स्थिती ओढवू शकते, हे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. 

मध्यंतरीच्या काळात बंद खाणींपासून तोडगा काढण्यासाठी लिलावाच्या खनिज मालाची वाहतूक आणि स्वामित्व धन अदा केलेल्या खाणींवरील खनिज मालाची वाहतूक अशाप्रकारे दोनवेळा सरकारने तोडगा काढला. पण हा तोडगा तकलादू असून खाणी सुरू व्हायला हव्यात, पण त्या नियोजनबद्धरीत्या अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

खाणी बंद झाल्यामुळे शहरातील विविध आस्थापनांवर विपरित परिणाम झाला. खाण उद्योग सुरू होता, त्यावेळेला लोक बिनधास्त खरेदी करायचे. पण खाणी बंद झाल्यानंतर लोकांच्या खिशात पैसा नसल्याने आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम जाणवला. विशेषतः शहरी भागातील आस्थापनेही त्यातून सुटली नाहीत.
- प्रमोद सावंत (दुकानदार, फोंडा)

खिशात पैसे असेतोवर खरेदी होते, पैसाच नसल्यावर काय खरेदी करणार, हा सवाल असतो. नेमका हाच प्रत्यय खाणी बंद झाल्यामुळे उद्योग व्यवसायावर जाणवला. एरव्ही खाणी सुरू होत्या, त्यावेळेला ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध दुकानात खरेदीसाठी गर्दी व्हायची. लोक बिनधास्तपणे खरेदी करायचे, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही, त्यामुळे खाणी सुरू होणे गरजेचे आहे.
- पांडुरंग फडते (दुकानदार, भामई - पाळी)

बॅंकांतील कर्जे थकली!
खाणी सुरू होत्या, त्यावेळेला लोकांनी ट्रक तसेच मशिनरी व इतर वाहने घेण्यासाठी बॅंका, पतसंस्थांकडून कर्जे काढली. पण खाणी बंद झाल्यानंतर ही कर्जफेड करणे मुश्‍कील ठरले. केवळ दिलासादायक बाब म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी ट्रक व्यावसायिकांना तसेच इतर मशिनरीवाल्यांना एकरकमी कर्ज फेड योजना लागू केली तसेच ट्रकवाल्यांना आर्थिक पॅकेजही दिले. मात्र हे पॅकेज सर्वांनाच मिळाले असे नाही, तरीपण बहुतांश लोकांनी त्याचा फायदा घेतला, त्यामुळे वणव्यात कुठेतरी पाणवठ्याचा अनुभव या खाण अवलंबितांना मिळाला.
 

संबंधित बातम्या