खाण व्यवसाय बंद असल्यानं ट्रक, मशिनरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न ऐरणीवर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

ट्रक मालकांनी गेल्या आठ वर्षांपासून न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानुसार लवकरात लवकर खाण व्यवसाय परत सुरू होण्यासाठी गणेश भक्तांनी गणरायाला साकडे घातले. 

फोंडा: राज्यातील गणेश चतुर्थी उत्सव संपल्यानंतर खाण पट्ट्यातील लक्ष आता बंद असलेला खाण व्यवसाय कधी सुरू होईल या प्रतीक्षेत ट्रक मालक आहेत. यंदा लोकांनी गणेशचतुर्थी उत्सव कोरोनाच्या महामारीला तोंड देत साजरा करण्यात आला असून त्यामुळे लोकांनी दीड दिवसाची गणेशचतुर्थी साजरी करून गणेशमूर्तीचे दिवसाढवळ्या विर्सजन करण्याचा प्रसंग ओढवला. ट्रक मालकांनी गेल्या आठ वर्षांपासून न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानुसार लवकरात लवकर खाण व्यवसाय परत सुरू होण्यासाठी गणेश भक्तांनी गणरायाला साकडे घातले. 

खाण व्यवसाय बंद असल्याने खाण व्यवसायावर विसंबून असलेल्या विविध घटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खाण व्यवसाय हा प्रामुख्याने राज्यातील अर्थव्यवस्थेचा कणा असून खाणपट्ट्यात सरकारने खाण व्यवसाय कायदेशीररीत्या सुरू करून लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक पर्याय समोर आणले  आहेत. खाण व्यवसायात निगडित असलेल्या खाण मालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याला अनुसरून खाणग्रस्त भागात येणाऱ्या काही पंचायतींनी त्या याचिकेत सहभागी करून घेण्याची सूचना केली आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू होणार या आशेने ट्रक मालकांनी आपल्या ट्रकांची रंगरंगोटी करून नूतनीकरण करून घेण्यात आले आहे. खाण व्यवसाय बंद असल्याने खाणपट्ट्यातील बहुतेक ट्रकमालकांनी आपले टीप्पर ट्रक विक्रीस काढून बॅंकाचे कर्ज फेडले गेले. 

राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा नव्या दम्याने सुरू होणार या आशेने टिप्पर ट्रक मालकांनी बॅंकाचे परत कर्ज काढून नवीन टिप्पर ट्रक खरेदी करण्याचे प्रयत्न चालू करण्यात आले आहे. सध्या एका नवीन टिप्पर ट्रकच्या मागे ट्रक मालकांना किमान वीस ते बावीस लाख रुपये मोजावे लागत आहे. गेल्या दहा बारा वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी दहा लाखाच्या खाली टिप्पर ट्रक विक्री होत होते. नवीन टिप्पर ट्रकच्या खरेदीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहे. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी खाणपट्ट्यातील खाण व्यवसाय कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रोजगार नसल्याने ट्रक व्यवसायात
खाणपट्ट्यात अन्य उद्योग व्यवसाय उभारले नसल्याने बहुतांश युवा वर्ग खाणीशी संबंधित व्यवसायातच अडकला. खाणींवर काम करणे अथवा खाणीशी संबंधित ट्रक किंवा मशीनरी घेणे याकडे येथील युवावर्गाने लक्ष केंद्रित केले आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशा ट्रक व मशीनरी व्यवसायातून बक्कल कमाई होत असल्याने खाणपट्ट्यातील युवा वर्ग खाणीशी संबंधित रोजगारातच रमला. पण पहिल्यांदा जेव्हा खाणी बंद झाल्या आणि दुसऱ्यांदाही न्यायालयाचा हातोडा अंदाधुंद खाण व्‍यवसायावर पडल्यामुळे हा व्यवसायच ठप्प झाला त्यामुळे अचानकपणे रोजीरोटी हिरावली गेल्याने खऱ्या अर्थाने इतर उद्योगासंबंधीचे महत्त्व खाणपट्ट्यातील युवा वर्गाला कळले. त्यामुळे खाणीशिवाय अन्य उद्योग आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने खाणपट्ट्यात उभारले नसल्याने खाणपट्‍ट्यातील लोकांचे भवितव्य एका अर्थाने सरकारनेच मातीमोल करून टाकले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

खाण पट्ट्यातील लोकांचा खाण व्यवसाय हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असून या व्यवसायावर लोक आपली रोजीरोटी चालवित आले आहे. त्यासाठी सरकारने प्रलंबित असलेल्या खाणी त्वरित पुन्हा सुरू करण्यास काळाची गरज आहे. - अनिल गावकर, ट्रकमालक धारबांदोडा.

आमच्याकडे टिप्पर ट्रक असून देखील बेरोजगार राहण्याची पाळी आली असून त्यात आता ट्रक व्यवसायाला कोरोनाच्या महामारीला सामोरे जावे लागत आहे.सरकारने यात जातिनिशी लक्ष घालून खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. - समीर नाईक, ट्रक मालक तिस्क उसगाव.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या