Mining In Goa: राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार असताना खाणी सुरू करण्यासाठी दहा वर्षे का लागली ?

राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी अखेर सरकारने ऑक्टोबर महिना जाहीर केला आहे.
Mining In Goa
Mining In GoaDainik Gomantak

Mining In Goa: राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी अखेर सरकारने ऑक्टोबर महिना जाहीर केला आहे. सद्य:स्थितीत खाणींचा लिलाव झाला आहे. आता कायदेशीर सोपस्कार पार पडायचे आहेत. राज्यातील बहुतांश खाणी अजूनही लिलावाविना आहेत.

त्यांची लिलाव प्रक्रिया आणि नंतर मग...काय सांगणार? गेली दहा वर्षे खाणी बंदच राहिल्या आहेत. केवळ लिलावाचा तेवढा खनिज माल वाहतूक झाला, पण तो यथातथाच. तसे पाहिले तर राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असताना खाणी सुरू करण्यासाठी दहा वर्षे का लागली, याचेच आश्‍चर्य खाण अवलंबितांना आहे.

लिलाव करायचाच होता तर तो मागेच का केला नाही? आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खाणी सुरू करण्याचे गाजर दाखविण्‍यात आले आहेत का, असे लोक बोलत आहेत.

सरकारी फाईल चोर!

‘कुंपणानेच शेत खाल्ले तर त्याला कोण काय करणार?’ अशी एक म्हण आहे. अनेक सरकारी खात्यांत त्याच खात्यातील काही कर्मचारी महत्वाच्या फाईली गायब करतात अशा तक्रारी आपण अनेक वेळा ऐकल्या असणार.

कुंकळ्‍ळी पालिकेत तर फाईली गायब करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे काही कर्मचारी मानतात. आता ही चोरीची सवय मोठ्या खात्यांतही पोहोचली आहे.

सासष्टी मामलेदार कार्यालय व गटविकास अधिकाऱ्याच्‍या कार्यालयातून महत्त्‍वाच्‍या फाईली चोरीला गेल्याची तक्रार मामलेदार व बीडीओने पोलिसांत केली आहे.

एका प्रकरणात तर गुन्हाही नोंदविला आहे. फाईली चोरांचा सुळसुळाट सध्‍या सर्वत्र झालेला आहे. दोतोर प्रमोदजी, पाहिले ना आपले सरकारी कर्मचारी.

Mining In Goa
Mahadayi Water Dispute: ...यासाठी कर्नाटकला वन विभागाची मंजुरी लागणारच

खासदारांचे योगदान किती?

सोमवारी विर्डी-साखळी येथे म्हादई समर्थकांनी जे विराट शक्तिप्रदर्शन घडवून आणले, त्यानंतर एकेकाचा म्हादईप्रती कळवळा ओसंडून वाहताना दिसून आहे. त्यात इतरांबरोबर आपले सार्दिनबाबही आहेत.

इतरांची गोष्ट सोडा, पण तीनवेळा खासदार म्हणून लोकसभेत गेलेल्या सार्दिनबाबनी किती वेळा तेथे म्हादईबाबत सभागृहाचे लक्ष वेधले, असे प्रश्न आता केले जाऊ लागले आहेत. दर आठवड्याला पत्रकार परिषद घेऊन इतरांना तत्‍वज्ञानाचे डोस पाजणाऱ्यांना पत्रकारांनी हा प्रश्न करायला हवा.

गोव्याचे अन्य दोन खासदार हे सत्ताधारी भाजपचे असल्याने त्यांच्याकडून ते अपेक्षित नाही. पण सार्दिनबाबना कुणीच अडविले नव्हते, हे तेवढेच खरे. ∙∙∙

ट्रस्‍टचा उद्देश जाणून घ्‍या

गोव्यात अनेक ट्रस्ट आहेत. पण ती कोणत्या उद्देशाने स्थापन करतात हे बऱ्याच लोकांना उशिरा समजते. पण मडकईतील एक ट्रस्ट मात्र खूप छान काम करत आहे.

आता हे ट्रस्ट ढवळीकर कुटुंबीयांशी जरी संबंधित असले तरी त्‍या ट्रस्टद्वारे हाती घेण्यात येणारे उपक्रम आणि त्यातल्या त्यात मडकईतील शेतीला उर्जितावस्था देण्‍यासाठी करण्यात येणारे प्रयत्न उल्लेखनीय असेच आहेत.

शेवटी एखादे ट्रस्ट स्थापन केले तरी त्यातून समाजाला काय मिळाले हे आधी पाहावे लागते. नाहीतर बहुतांश ट्रस्ट स्थापन होतात आणि मग भरपूर पैसा जमा झाला की सुरू होते ती सुंदोपसुंदी.

Mining In Goa
Mahadayi Water Dispute: म्‍हादईचे पाणी वळविण्‍यामागे मोठे षडयंत्र; करणार पर्दाफाश

मंत्र्याच्या नावाचा धाक!

केपे नगरनियोजन खात्याचे कार्यालय नेहमीच या ना त्या कारणाने वादात असते. दोन दिवसांपूर्वी कुडचडे येथील एका व्यक्तीने या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे हे कार्यालय पुन्हा चर्चेत आले. वास्तविक सरकारी नोकराला कामावर असताना अशी शिवीगाळ करणे हा गुन्हाच आहे.

त्यामुळे त्या माणसाविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी त्या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्‍ठांकडे केली. मात्र शिवीगाळ करणारा माणूस एका मंत्र्याला जवळचा असल्यामुळे म्हणे त्या वरिष्‍ठाने ही तक्रार करणे टाळले. वरून म्हणे त्या कर्मचाऱ्यालाच समज दिली.

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. अशावेळी अशी तक्रार केली आणि त्या मंत्र्याने आमच्याच कुंडल्‍या बाहेर काढल्या तर आमचीच गोची होईल ना? यावर तो बिचारा कर्मचारी गप्‍प बसला. असतात एकेकाचे दिवस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com