पैरा येथे खनिज वाहतूक रोखली 

Dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

उरलीसुरली शेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांच्या मागणीबाबतीत कंपनी व्यवस्थापन कानावर हात ठेवत आहेत. असा दावा करीत मयेतील शेतकऱ्यांनी एकत्रित येताना  पैरा येथे धडक देवून खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. 

डिचोली

प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत मयेतील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताना  रस्त्यावर उतरले. संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पुढे करीत पैरा येथे खनिज वाहतूक रोखून धरली. अखेर डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी शिष्टाई करताना संयुक्‍त बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. आणि अखेर तासाभरानंतर खनिज वाहतूक पूर्ववत सुरु झाली. मुळाक खाजन संघटनेचे अध्यक्ष यशवंत कारभाटकर, सदस्य तथा मयेचे माजी सरपंच सखाराम पेडणेकर, पंगार पाक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उमेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पैरा येथे खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले. यावेळी राजेश कळंगुटकर, एनजीओ आनंद गाड आदी उपस्थित होते. 
शेतकरी दुर्लक्षीत !
खाण व्यवसायामुळे मये भागातील शेती उध्वस्त झाली आहे. खाण व्यवसायामुळे आम्ही शेती करण्याकडे पाठ केली आहे. सरकारी आदेश असताना आणि वारंवार मागणी करुनही  प्रलंबित नुकसान भरपाई देण्याकडे खाण कंपनींचे दुर्लक्ष होत आहे. खाणबंदी काळापासून तर खाण कंपन्यांनी आमच्या मागणीबाबत कानावर हात ठेवले आहे. यासंबंधी स्थानिक पंचायत, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, खाण आणि भुगर्भ खाते आदी सरकारी यंत्रणांना निवेदन देवूनही आतापर्यंत आमच्या पदरी निराशाच पडलेली आहे. आश्वासना व्यतिरिक्‍त काहीच मिळालेले नाही. आमच्या व्यथा दूर करण्यास सरकारकडूनही अनास्था दिसून येत आहे. असा शेतकऱ्यांचा दावा आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात मयेतील शेतकऱ्यांनी खनिज वाहतूक रोखली होती. त्यावेळी सरकारी यंत्रणांनी हस्तक्षेप करुन, शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मागील जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी खनिज वाहतुकीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आशादायक आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजतागायत त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यातच सेझा (वेदांता) कंपनीतर्फे पैरा येथील चौगुले खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे उरलीसुरली शेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांच्या मागणीबाबतीत कंपनी व्यवस्थापन कानावर हात ठेवत आहेत. असा दावा करीत मयेतील शेतकऱ्यांनी एकत्रित येताना  पैरा येथे धडक देवून खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. 
मामलेदारांची शिष्टाई !
खनिज वाहतूक रोखल्यानंतर काहीवेळाने पोलिस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन उपाय काढण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रश्‍नी डिचोलीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयात खाण व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांची संयुक्‍त बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. नंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेवून खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

 

 

संबंधित बातम्या