कळंगुटच्या शहरीकरणाचा मुद्दा तापला; मंत्री मायकल लोबोंवर गंभीर टीका

michel lobo.jpg
michel lobo.jpg

पणजी: राज्यातील भाजप सरकार (BJP Government) या सुंदर भूमीला केंद्र सरकारच्या भांडवलदार मित्रांना विकण्यासाठी विविध डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटला (Calangute) शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्यादृष्टीने  उचललेले पाऊल आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते तुलियो डिसोझा उपस्थित होते. (Minister Michael Lobe has been criticized over the issue of urbanization in Calangute)

फर्नांडिस म्हणाले, कळंगुटला शहरी दर्जा जाहीर करण्यापूर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेले नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नाही. सरकारने अधिसुचित केल्याप्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली 200 मीटर बांधकामाची अट शिथिल होवून 50 मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. 

केंद्र सरकारच्या भांडवलदार मित्रांना  हॉटेल्स व इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असून,  प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायिक तसेच जल क्रीडा व्यावसायिकांना जगणे मुश्कील होणार आहे.

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने 56 गावांना शहरी दर्जा देण्याची 30 जानेवारी 2020 रोजी जारी केलेली अधिसुचना 18 फेब्रुवारी रोजी रद्द केली होती याची आठवण करुन देऊन डिसोझा म्हणाले, फेब्रुवारी 2020 ते 27 मे 2021 च्या दरम्यान असे काय घडले जेणेकरुन भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली याचे उत्तर सरकारने द्यावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित 27 मे 2021 रोजी कळंगुटला शहरी दर्जा देणारी अधिसुचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास कॉंग्रेस पक्ष स्थानीक लोकांना बरोबर घेवुन प्रखर आंदोलन करणार आहे.  कॉंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनून गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल.

कळंगुट शहरीकरणाची अधिसूचना रद्द करा

राज्य एका बाजूने कोविड महामारीच्या प्रकोपातून जात असताना दुसऱ्या बाजूने पर्वरीतील विधानसभा संकुलाच्या बंद दरवाजाआड बसून कळंगुट गावचा समावेश शहरी विभागाशी जोडण्याचा स्वार्थी डाव स्वतःला दूरदृष्टीचा नेता म्हणणाऱ्या कळंगुटचे आमदार तथा मंत्री असलेल्या मायकल लोबो यांच्याकडून आखला जात आहे. शहरीकरणामुळे कळंगुटचा नाश तसेच अस्तितवाचा प्रश्न निर्माण  होणार असल्याने कळंगुट पंचायतीकडून यासंबंधात विशेष ग्रामसभा बोलविण्याचे आवाहन करतानाच सरकारकडून कळंगुटच्या शहरीकरणाची अधिसूचना रद्द करण्याची जोरदार मागणी माजी सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी केली आहे. 

गुरुवारी सकाळी त्यांच्या कळंगुट येथील कार्यालयात घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन कळंगुटचे आमदार सुरेश परुळेकर यांच्या कार्यकाळात कळंगुट गाव नगरपालिका क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु स्वाभिमानी कळंगुटकरांनी त्याविरोधात कायदेशीर लढा देत  तो प्रयत्न हाणून पाडल्याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. 

मंत्री लोबो यांनी किनारी भागातील बेकायदा घरे कायदेशीर करण्याचे आश्वासन देत नगरनियोजन प्राधिकरणाची निर्मिती केली होती. मात्र, अद्याप किनारी भागातील सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या घरांचा प्रश्न आधांतरीच असल्याचे सिक्वेरा यांनी  सांगितले. आता तोच मुद्दा उपस्थित करीत मंत्री लोबो यांनी कळंगुट गावचा  समावेश शहरीकरणात करण्याचा डाव आखला आहे. मात्र, कळंगुटची जनता याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नसल्याचे जोजफ सिक्वेरा यांनी इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com