कोळसा विरोधी निवेदन स्वीकारण्यास मंत्री मिलिंद नाईक यांची असमर्थता..!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

 गोव्यातून पूर्णपणे कोळसा हद्दपार करा, मुरगाव बंदरातील कोळसा आयात बंद करा अशी मागणी करणारे निवेदन घेऊन नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या निवासस्थानी गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारण्यास मंत्री नाईक यांनी असमर्थता दर्शविली, अशी माहिती आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

 मुरगाव  : गोव्यातून पूर्णपणे कोळसा हद्दपार करा, मुरगाव बंदरातील कोळसा आयात बंद करा अशी मागणी करणारे निवेदन घेऊन नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या निवासस्थानी गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारण्यास मंत्री नाईक यांनी असमर्थता दर्शविली, अशी माहिती आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे दुपदरीकरण केले जात आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील सात मतदारसंघ क्षेत्रातील लोकांना अनेक यातना भोगाव्या लागणार आहेत, हे ध्यानात घेऊन ‘आप’ने कुडचडे, सावर्डे, नुवे, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव या सात मतदारसंघांतील आमदारांना निवेदन सादर करून रेल्वे दुपदरीकरण आणि मुरगाव बंदरातील कोळसा आयात बंद करण्याच्या जनतेच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील आमदारांना आवाहन केले आहे. या सातही आमदारांना ‘आप’ने निवेदन सादर केले आहे.

दरम्यान, सात पैकी सहा आमदारांनी ‘आप’चे निवेदन स्वीकारले. पण, मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी सुरवातीला निवेदन स्वीकारले पण ते निवेदन कोळसा विरोधात असल्याचे कळल्यावर त्यांनी ते परत केले. आपचे दक्षिण गोव्यातील नेते संदेश तळेकर यांच्या नेतृत्वाखाली परशुराम सोनुर्लेकर, पोब्रेज वाझ, कॅ. वेन्सी व्हेगस, लॉरेन्स डिसोझा यांनी जेटी येथील मंत्री नाईक यांच्या खासगी बंगल्यावर जाऊन निवेदन सादर केले होते. यावेळी आपच्या नेत्यांनी सदर निवेदनाची माहिती मंत्र्यांना देताच मंत्री नाईक यांनी हे निवेदन पुन्हा आपच्या नेत्यांच्या हवाली करून सचिवालयात येऊन निवेदन द्यावे, असा सल्ला दिला. तसेच कोळशा विरोधात आंदोलन करायचे असेल तर आपल्या भागातील लोकांना घेऊन मुरगावात या असे सांगितल्याचे आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

कोळसा व्यवसायात मंत्री नाईक यांची एम. एन. कन्स्ट्रक्शन कंपनी गुंतलेली आहे. या कंपनी मार्फत स्टिओडरींग, ट्रान्सपोर्टींग, आणि अन्य व्यवसाय बंदरात हाताळला जात आहे.या व्यवसायावर मंत्री नाईक अवलंबून असल्याने ‘आप’चे निवेदन मंत्री नाईक यांनी घेतले नसल्याचा आरोप आपचे प्रवक्ते परशुराम सोनुर्लेकर यांनी केला. कोळसा विरोधात भूमिका घेण्यास मुरगावचे आमदार मिलिंद नाईक घाबरत आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी नाही, असा आरोप दक्षिण गोव्याचे आपचे नेते संदेश तळेकर यांनी केला.

संबंधित बातम्या