फोंडा ‘मास्टरप्लॅन’साठी नियोजन सुरू !

प्रमुख प्रश्‍नांवर चर्चा : मंत्री रवी नाईक यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
फोंडा ‘मास्टरप्लॅन’साठी नियोजन सुरू !
Ravi Naik Dainik Gomantak

फोंडा : फोंड्यात अर्धवट राहिलेली विकासकामे त्वरित पूर्ण करण्याबरोबरच शहराचा मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार आहे. या मास्टप्लॅनमध्ये फोंडावासीयांच्या संकल्पना विचारात घेतल्या जाणार असून फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे फोंडाचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांची होणारी गैरसोय तसेच पाणी व वीज समस्या, पार्किंग व वाहतूक कोंडीवर प्रामुख्याने चर्चा झाली.

या बैठकीला कृषीमंत्री रवी नाईक यांच्यासमवेत नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच नगरसेवक व अतिरिक्त जिल्हाधिकारी इतर सर्व संबंधित सरकारी खात्यांचे अधिकारी, पालिका मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. रवी नाईक यांनी फोंड्यात पावसामुळे उद्भवलेल्या पाणी निचरा समस्या तसेच वीज व पाण्याच्या समस्येवरही चर्चा करून आवश्‍यक निर्णय घेतले.

शहरात व पंचायतक्षेत्रात काही ठिकाणी गटारे खाली गेल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्ते जलमय होत आहेत. विशेषतः कुर्टी हाऊसिंग बोर्ड कॉलनीजवळ तर रस्ता पाण्याखाली जात असल्याने तिथे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची सूचना कृषिमंत्र्यांनी केल्यानंतर लगेच कार्यवाही करण्यात आली.

फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलजवळ वाहनांच्या वर्दळीमुळे तसेच जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे विद्यालय व्यवस्थापनाकडे चर्चा करून पोलिसांतर्फे योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे. सुरळीत पार्किंग व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

फोंडा जुने बसस्थानकावरील झरेश्‍वर मंदिरापासून ढवळी बगल रस्त्यापर्यंत नवीन रस्ता साकारण्यात येणार आहे. या नव्या रस्त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून वाहनांचा ताणही कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. मिशन चकाचक फोंडांतर्गत आवश्‍यक त्याठिकाणी हायमास्ट दिवे घालण्यात येतील, शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.

नव्या मासळी मार्केटची होणार उभारणी फोंड्यात भव्य शास्त्री मॉलबरोबरच गोल्डन ज्युबिली प्रकल्पाला चालना देऊन रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे गाडे तसेच जागा मिळेल तेथे होणाऱ्या मासेविक्रीवरही निर्बंध लादण्यात येणार आहेत. फोंड्यात नवीन मासळी मार्केट उभारण्यात येणार आहे. पूर्वीचे मासळी मार्केट पाडून त्याजागी प्रशस्त असा हा प्रकल्प साकारण्यात येईल,असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.

Ravi Naik
कुडचडे नगराध्यक्षपदी जास्मिन ब्रागांझा यांची बिनविरोध निवड

फोंड्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फोंडा पालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पार्किंगसाठी पट्टे मारले आहेत, या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी मार्किंग केले असले तरी काही ठिकाणी वाहनचालक मनमानी करीत आहेत, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना जरब बसावी यासाठी वाहतूक पोलिस अशी वाहने उचलून नेतील. त्यासाठी पोलिसांना आवश्‍यक वाहन देण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

फोंडा शहराचा स्मार्ट सिटीसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून विकासकामांना निधी उपलब्ध केला जाईल. विशेष म्हणजे फोंड्यातील जुन्या वीजवाहिन्या बदलण्याबरोबरच आवश्‍यक त्या ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसवणे, भूमिगत वीजवाहिन्या घालणे तसेच इतर विजेसंबंधीच्या सुविधेसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून फोंड्यातील विजेची समस्या दूर होणे शक्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com