म्हापसा बाजारपेठेची आमदार ज्योशुआ डिसोझाकडून पाहणी

वार्ताहर
रविवार, 13 सप्टेंबर 2020

पार्किंग प्रश्न, बाजाराच्या गेट्स खुल्या-बंदची समस्येवर चर्चा

म्हापसा: म्हापसा व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मागच्या आठवड्यात आमदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन म्हापसा बाजारात पाहणी करण्यास येण्याची विनंती केल्यानुसार आज शनिवारी सकाळी आमदार ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा व मुख्याधिकारी कबीर शिरावकर यांनी या बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाऱ्यांच्या सूचना व तक्रारी जाणून घेतल्या.

चार-चाकी वाहने दुचाकी मोटरसायकल पार्किंगच्या जागेत पार्क केली जातात. त्यासंदर्भात कंत्राटदाराशी चर्चा करून तो प्रश्न सेडवण्यात येईल. तसेच, पुन्हा व्यापारउदीम जोमात सुरू होण्यासाठी बाजारातील सर्व गेट्‍स वेळेवर खुल्या करणे व बंद करणे याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जाईल, असेही आमदार डिसोझा यांनी सांगितले.

बाजाराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी सांगितले, मागच्या आठ दिवसांपूर्वी मी बाजारात येणारच होतो; पण, काही कारणांस्तव येऊ शकलो नाही. व्यापारी संघटनेने अनेक सूचना व काही अडी-अडचणी मांडल्यामुळे या सर्व तक्रारींवर लवकरच चर्चा करून त्या समस्या सोडवण्यात येतील. बाजारपेठेच्या संदर्भातील महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या बाजारात कोविडमुळे ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. तसेच पर्यटक येणेही बंद झाले आहे. त्यामुळे बाजारातील रेलचेलच बंद झाली आहे. बाजाराला कोविड महासंकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.

नगराध्यक्ष रायन ब्रागांझा म्हणाले, कोरोना महामारीचा काळ आणखीन पाच वर्षे संपणार नाही असे वाटते. अशा परिस्थितीत म्हापसा पालिका मंडळ व म्हापसा व्यापारी संघटना हातांत हात घालून बाजारपेठेच्या गतवैभवाला चालना देणार आहे. बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांची वर्दळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्राहकच उपलब्ध नसल्याने दुकानांचे भाडे भरणेही व्यापाऱ्यांना शक्य होत नाही, याची जाणीव पालिकेला आहे. त्यामुळे, व्यापारी संघटनेच्या सूचना अमलात आणल्या जातील.

म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी सांगितले, म्हापसा बाजारपेठेच्या कामकाजात लहानमोठ्या त्रुटी आहेत. त्या त्रुटी सोडवण्याचे आश्वासन आमदार, नगराध्यक्ष व मु्ख्याधिकारी यांनी दिले आहे. आम्ही बाजारात ‘दिवाळी धमाका’ उत्सव साजरा करणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना बाजारात खरेदीसाठी आकर्षित केले जाणार आहे. गोव्यात सर्व बाजारपेठांत फिरून पाहिल्यास केवळ म्हापसा बाजारपेठेत सामाजिक अंतर व सरकारने घालून दिलेल्या इतर नियमांचे पालन होत असे हे आढळून येते. आम्ही म्हापशाच्या आमदारांसमोर आज पार्किंग समस्या, शौचालय, गेट्‍स इत्यादींच्या संदर्भात तक्रारी सादर केल्या. तसेच, म्हापसा बाजारपेठेच्या बाहेर मासळी व भाजी विक्री करणाऱ्या फेरीविक्रेत्यांना हटवण्याची मागणीही केली आहे. त्यांना मासळी व भाजी मार्केटात व्यवसाय करण्यास संधी देण्याची सूचना त्यांच्यासमोर मांडली आहे.

यावेळी आमदारांसमवेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याबरोबरच बाजार समितीचे अध्यक्ष सुशांत हरमलकर, नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो, शेखर बेनकर, म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, सचिव आसिस कार्दोज, श्रीपाद सामंत,  अमर कवळेकर, राजू कुडतरकर, जितेंद्र फळारी व इतर व्यापारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या