Goa Politics: प्रसाद गावकर काँग्रेसच्या कळपात; प्रभारींसोबत गुप्त बैठक
prasad gaonkar.jpg

Goa Politics: प्रसाद गावकर काँग्रेसच्या कळपात; प्रभारींसोबत गुप्त बैठक

पणजी: तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले कॉंग्रेसचे (Congress) राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांना कॉंग्रेसच्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. गावकर व त्यांची पणजीत एका ठिकाणी गुप्त बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत ते सांगे मतदारसंघातून कॉंग्रेसकडून लढणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे. (MLA Prasad Ajgaonkar likely to join Congress)

कॉंग्रेस पक्षाने ऊस बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सांगे मतदारसंघात आंदोलन केले होते. त्याचवेळी सांगे मतदारसंघात असलेली पक्षाची ताकद गावकर यांच्या लक्षात आली होती. सांगे पालिका निवडणुकीत माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी तेथे तळ देत त्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते निवडून आणले. त्यामुळे अपक्ष लढणे या परिस्थितीत जड जाणार हे गावकर यांना बहुधा समजले असावे. त्यांच्याशी याबाबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्राथमिक चर्चा केली होती. गावकर हे राव यांना मडगावात भेटले असते तर त्याची खबर सर्वांना लागण्यास वेळ लागला नसता त्यामुळे पणजी शहराची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी गावकर व राव स्वतंत्रपणे पणजीत आले आणि चोडणकर यांच्या मध्यस्थीने ते भेटले.  

राव यांनी आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, खासदार फ्रांसिस सार्दिन, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याशी चर्चा करून त्यांनी राजकीय परिस्थितीचे आणि सद्यस्थितीचे  हे ज्येष्ठ नेते कसे विश्लेषण करतात ते जाणून घेतले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी संघटनेत कोणते बदल करणे अपेक्षित आहे आणि उमेदवारी देताना कोणते निकष लावावेत याविषयीही राव यांना या नेत्यांनी प्रश्न विचारले. या भेटीवेळी अन्य कोणताही पदाधिकारी उपस्थित राहणार नाही याची दक्षता राव यांनी  घेतली होती. 

काँग्रेसचे प्रभारी गुंडूराव यांच्यासोबत माझी प्राथमिक बोलणी झाली असून मी त्यांच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे असे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले आहेत. दरम्यान दिनेश गुंडू राव हे 19 जुन रोजी सांताक्रुझ, कुंभारजुवे आणि साखळी मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तेथील पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, गट समित्यांचे सदस्य यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. या मतदारसंघांची निवड त्यांनीच दौऱ्यासाठी केली आहे. या चर्चेवेळी प्रदेश पातळीवर नेता उपस्थित नसेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com