'कोविड रूग्णांच्या मृत्यूपेक्षा सरकारचे भ्रष्टाचाराकडेच जास्त लक्ष'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५०० वर पोहचली असली तरी सरकार मात्र गृह अलगीकरण किट्सचे वितरण करून प्रसिद्धी मिळवण्यास मग्न आहे. हे किट्स रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने सरकारला जाग आली आहे. जर सरकारला हे प्रमाण नियंत्रणात आणता येत नसल्यास प्रसिद्धी स्टंट बंद करावा, असे आमदार खंवटे यांनी म्हटले आहे.  

पणजी- राज्यातील कोविड मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास आलेल्या अपयशाला सरकारचे गैरव्यवस्थापन व प्रशासन जबाबदार आहे. ही महामारी नियंत्रणात आणण्यापेक्षा विविध औषधे व उपकरणांमधून भ्रष्टाचाराची लूट करण्याकडे व आगामी निवडणुकीकडे भाजप सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे, असा हल्लाबोल पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार खंवटे म्हणाले की, राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५०० वर पोहचली असली तरी सरकार मात्र गृह अलगीकरण किट्सचे वितरण करून प्रसिद्धी मिळवण्यास मग्न आहे. हे किट्स रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने सरकारला जाग आली आहे. जर सरकारला हे प्रमाण नियंत्रणात आणता येत नसल्यास प्रसिद्धी स्टंट बंद करावा. कोविड महामारीमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही गेल्यावर्षीच्या त्या काळातील मृत्यू संख्येशी तुलना करणे म्हणजे लोकांच्या जीवाशी सरकार खेळत आहे असे दिसून येते. टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर वाहने नव्हती तर यावर्षी मृत्यूचे प्रमाण कमी झाले असे मुख्यमंत्री कसे काय सांगतात असा प्रश्‍न आमदार खंवटे यांनी केला. नियोजन व सांख्यिकी खात्याने कोणतीही लपाछुपी न करता श्‍वेतपत्रिका काढून ही माहिती स्पष्ट करावी. कोविड गैरव्यवस्थापनामुळे अनेक अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्सनी त्यातून अंग काढून घेतले आहे. कोविड महामारी उपचारासाठी भरमसाट दामदुप्पट किंमतीने उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसले तरी मुख्यमंत्री व आऱोग्यमंत्र्यांच्या संगनमतानेच हे सर्व काही सुरू असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात ५०० हून अधिक रुग्ण दगावले आहेत त्यापैकी १ सप्टेंबर २०२० ते आतापर्यंत ३०० हून अधिक रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. यावरून सरासरी दरदिवशी ८ ते १० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामागील कारणे देण्यात येत असली तरी सरकारकडून जबाबदारी झटकण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आगामी निवडणुकीच्या ‘मूड’मध्ये आहेत व ते स्वतःलाच पुढील निवडणुकीतील ‘शुभंकर’ असे संबोधले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने कोविड महामारी नियंत्रणात आणणे शक्य होते मात्र ज्या प्रकारे ही महामारी हाताळण्यात आली त्याचा पूर्ण बोजवारा वाजला आहे. गेल्या काही दिवसांत कोविड चाचणीचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालेला नसून उलट तो वाढत आहे, असे रोहन खंवटे म्हणाले.

कोविड महामारीचे उपचार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली आणावेत अशी मागणी मी सुरुवातीलाच केली होती. सरकारने ती दोन दिवसांपूर्वी अधिसूचना काढून मान्यही केली मात्र ती काल रद्द करून या योजनेखालील लाभार्थ्यांवर अन्याय केला आहे. या योजनेखाली कोविड उपचाराची गरज आहे. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय कोणतीच अधिसूचना जारी केली जात नाही तर मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सल्लामसलत झाली नव्हती का? असा प्रश्‍न आमदार खंवटे यांनी उपस्थित करून सरकारने कोर्पोरेट इस्पितळाच्या दबावासमोर नमून ही अधिसूचना रद्द केली. या सरकाराल सर्वसामान्य जनतेचे काहीच सोयरसुतक नाही अशी टीका त्यांनी केली. सरकारने या योजनेबाबत पुनर्विचार करून कोविड उपचार या योजनेखाली आणावेत अशी विनंती केली. सरकार लोकांवर अन्याय करत असल्याने हक्कसाठी संघटीतपणे आता रस्त्यावर येण्याची वेळ 
आहे.

संबंधित बातम्या