मेथर खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा- आमदार रोहन खंवटे

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

राज्यात घडणाऱ्या बेकायदा कृत्याविरोधात आवाज उठविल्यास सरकारला दुखते व त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी करण्याच्या मागे लागते असा आरोप आमदार खंवटे यांनी केला.

पणजी - पर्वरीस्थित विलास मेथर याच्या जळीतकांड हत्येप्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) याच्याकडे देण्याची मागणी पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे. खुनासारख्या प्रकरणाचा तपास करताना आपीएस अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याने त्याचा तपास योग्य दिशेने होत नसल्याची टीका त्यांनी केली. 

सरकारची लक्तरे उजेडात आणणाऱ्या विरोधकांना दबावाखाली ठेवण्यासाठी सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. मेथर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी मी मौन बाळगून होतो मात्र त्याचा अर्थ असा नाही की पोलिस चौकशीच्या नावाखाली जे काय करत आहेत त्याला मान्यता आहे. मेथर याच्या जळीतकांड प्रकरणाशी कोण आहेत हे सत्य बाहेर येऊ द्या. सरकारच्या होणाऱ्या हस्तक्षेपामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाच्या नावाखाली दबाव आणला जात आहे. ही पद्धत लोकांसाठी धोकादायक आहे. पर्वरी मतदारसंघात आपल्याविरोधात भाजप व काँग्रेसने हातमिळवणी करून माझी प्रतिमा डागळण्याचे षडयंत्र रचले आहे.

मेथर याच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा यासाठी पर्वरीत जी मेणबत्ती रॅली काढली त्यामागे राजकारण आहे. ही जर रॅली एनजीओ किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी काढली असती तर मी स्वतःहून त्यात सामील झालो असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ड्रग्स विक्री, मनी लॉडरिंग तसेच इतर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात घडणाऱ्या बेकायदा कृत्याविरोधात आवाज उठविल्यास सरकारला दुखते व त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी करण्याच्या मागे लागते असा आरोप आमदार खंवटे यांनी केला.

संबंधित बातम्या