'मी सरकारमधून बाहेर पडल्यामुळे भाजपकडून बदनामीचे राजकारण'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पर्वरीचे लोक माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे सरकारची मदत घेऊनही भाजपला काहीच शक्य होत नाही. त्यांनी पर्वरी मतदारसंघाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज भाजप व सरकारवर निशाणा साधताना केली.

पणजी-  ज्या दिवशी मी भाजप सरकारमधून बाहेर पडलो, तेव्हापासून पर्वरी मतदारसंघाला लक्ष्य ठरवून बदनाम करण्याचे राजकारण भाजपने सुरू केले आहे. पर्वरीचे लोक माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे सरकारची मदत घेऊनही भाजपला काहीच शक्य होत नाही. त्यांनी पर्वरी मतदारसंघाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज भाजप व सरकारवर निशाणा साधताना केली.

पर्वरीतील कोविड रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना या भागातील डॉक्टराची बदली सांगे येथे करण्यात आली. या मतदारसंघातील बेकायदा झोपडवालियांना आरोग्य केंद्राकडून आरोग्य कायद्याखाली ना हरकत दाखला देण्यास या डॉक्टरांनी नकार दिल्याने हा बदला घेण्यात आला. पर्वरीमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे दर्शविले जात आहे त्यामागे भाजप आहे, असा आरोप करून खंवटे म्हणाले की, पर्वरी मतदारसंघात खून व एटीएम चोरी यासारखे गुन्हे घडत आहेत मात्र पोलिस गाफील आहेत. पोलिस गस्त कमी करण्यात आली आहे तसेच पोलिस बीट पद्धतही बंद आहे. या पोलिस स्थानकाचा निरीक्षक सरकारच्या निर्देशानुसार वागत आहे. पर्वरी भागात सूडाचे राजकारण केले जात आहे. या मतदारसंघात डोंगर कपणी तसेच अनेक गैरकृत्ये सुरू आहेत व त्यामागे कळंगटचे मंत्री मायकल लोबो हे आहेत. त्यांनीच या मतदारसंघात परप्रांतियांना मतदार करण्यास पुढाकार घेत आहेत. सुकूर पंचायतीकडून ना हरकत दाखल देऊन त्यांची नावे मतदार यादीत घातली जात आहेत. 

पर्वरी मतदारसंघातील काही लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचार व गैरप्रकाराचा बडगा दाखवून आपल्या पक्षात नेले आहे. ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी आरोप झाले आहेत तो भाजपमध्ये गेल्यावर चौकशी बंद झाली आहे. काही काँग्रेसचे नेते हे भाजपला पाठिंबा देत पर्वरीतील जळीतकांडप्रकरणी राजकारण्यांवर निशाणा साधत आहेत मात्र त्यातून काहीच साध्य होणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आमचीही मागणी आहे. शैलेश शेट्टी हा आमचा कौटुंबिक मित्र आहे. कौटुंबिक मित्रत्व व राजकारण हे वेगवेगळे आहेत. त्याचा एकमेकाशी काहीच संबंध नाही, असे आमदार खंवटे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या