आमदार रोहन खंवटे यांच्या प्रतिमेचे दहन

वार्ताहर
रविवार, 20 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्याचा पर्वरी भाजपतर्फे निषेध

पर्वरी: आमदार रोहन खंवटे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर समाज माध्यमावरून नाहक आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. त्याच्या निषेधार्थ पर्वरी भाजप मंडळाने त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध केला. यावेळी मंडळ अध्यक्ष कुंदा चोडणकर, किशोर अस्नोडकर, अशोक शेट्टी, सुकुरचे सरपंच संदीप वझरकर, महानंद अस्नोडकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोविड १९ या महामारीच्या काळात खंवटे यांनी सरकारला सहकार्य करण्याऐवजी ते उठसुठ नाहक टीका करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी वायफळ बडबड करण्याऐवजी या महामारीतून सहीसलामत मार्ग काढण्यासाठी सहकार्य करावे. भाजप सरकारात मंत्री असताना त्यांनी पर्वरी मतदारसंघात जी विकासकामे केली ती भाजपच्याच सहकार्याने याचा त्यांना विसर पडू देऊ, असे कुंदा चोडणकर यांनी सांगितले.

खंवटे यांनी डॉ. प्रमोद सावंत यांचे व्यंगचित्र समाज माध्यमावर प्रसिध्द करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे. त्यासंबंधी त्यांनी माफी मागावी. मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे गोव्यात कोरोना रुग्ण मोठ्याप्रमाणात मरतात. या खंवटे यांच्या विधानाचा महानंद अस्नोडकर यांनी आपल्या भाषणात जोरदार निषेध केला.

आमदार रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांवर तथ्यहीन आरोप करत सुटले आहेत. त्यांनी पर्वरी मतदारसंघाच्या विकासकामांवर लक्ष द्यावे नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत लोकच त्यांना घरी पाठवतील, असे उद्गार सरपंच संदीप वझरकर यांनी काढले.

संबंधित बातम्या