अरे आधी गोवा पर्यटकांना आवरा...

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत आहे.

फोंडा : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने रात्री आठ ते सकाळी सहापर्यंत कर्फ्यू लावणे आवश्‍यक आहे. केवळ १४४ कलम लागू करून सर्वांना मोकाट सोडणे म्हणजे सरकारचेच हसे होण्यासारखा प्रकार असून सरकारने आता तरी जागे व्हावे, असे आवाहन मगो पक्षाचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. मुळात उत्सव, तसेच इतर घरगुती सोहळे पुढे ढकला, गर्दी टाळा, असे आवाहनही त्यांनी केले. 

फोंड्यातील पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक तसेच बांदोड्याचे सरपंच राजेश नाईक तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते. सुदिन ढवळीकर म्हणाले, की गोव्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारने प्रभावी उपायोजना केली नाही, तर देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही मोठा हाहाःकार माजेल हे समजून घ्या, असे त्यांनी सांगितले. (MLA Sudin Dhavalikar said Goa tourists should be covered and curfew imposed)

गोव्यात आता वर्केशन; कामाबरोबरच एंजाॅयमेंटही!

गोवा (Goa) हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत आहे. या पर्यटकांना वाढत्या कोरोनाचे गांभीर्य नाही, ‘खाओ पिओ मजा करो’ अशा धुंदीत वावरणाऱ्या या पर्यटकांना आतातरी सरकारने आवरण्याची गरज असून राज्याची प्रवेशद्वारे सताड उघडी असल्याने ‘आव जाव घर तुम्हारा’ असा प्रकार घडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक निर्बंध लावताना विशेषतः कसिनोवर मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना कोविड तपासणी पत्र आणणे बंधनकारक केले पाहिजे. 

कसिनोवर जाणाऱ्या पर्यटकांना हॉटेल ते कसिनो असा प्रवास करण्यासाठी मुभा द्यावी, अन्य ठिकाणची या पर्यटकांची भटकंती रोखली पाहिजे, तरच गोवा वाचू शकेल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. नुसतेच १४४ कलम लागू करून देखावा केला म्हणून गोमंतकीयांच्या जीवावरचा प्रसंग टळणार नाही, असेही त्यांनी 
सांगितले. 

दरम्यान, फोंड्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सर्व रस्ते येत्या ३१ मे पूर्वी हॉटमिक्‍स होतील, या विधानावर बोलताना कामाच्या निविदा आणि इतर प्रक्रिया झाल्याशिवाय कुणीही अशाप्रकारची आश्‍वासने देऊ नयेत, प्रत्यक्षात कार्यवाहीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुळात गेल्या २०१७ सालची या खात्याची कामेच अजून सुरू झालेली नाहीत, तीच कामे पुढे नेली जात आहेत, त्यामुळे रस्ता डांबरीकरणासाठी लागणारे डांबर आणि इतर साहित्याबरोबरच कागदोपत्री योग्य कार्यवाही अपेक्षित असल्याचेही सुदिन ढवळीकर म्हणाले. मडकईतील वाढत्या पाण्याच्या गरजेसंबंधी बोलताना लोकसंख्या वाढते, घरांची संख्या वाढते, तशी पाण्याची गरजही वाढत असते, त्याचाच हा परिपाक असून मडकई मतदारसंघात तीन ठिकाणी पाण्याची समस्या आहे ती नजीकच्या काळात निकाली काढली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

कोविडसंबंधी ‘मगो’कडून जनजागृती
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांप्रती मडकई मतदारसंघात मगो पक्षाचा आमदार या नात्याने सातत्याने जनजागृती केली आहे. इतर मतदारसंघात झाली नसतील, एवढी आरोग्य शिबिरे या मतदारसंघात तसेच अन्य ठिकाणी झाली असून मगो पक्षाचा प्रतिनिधी या नात्याने आपण पुढाकार घेतला, त्यासाठी पंचायत मंडळाने आवश्‍यक सरहकार्य दिले, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले. आताही कोविडसंबंधीची लसीकरण मोहीम मडकई मतदारसंघात जोरात सुरू असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित बातम्या